नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका गरीब आणि श्रमिकांना बसला आहे. त्यांना प्रचंड वेदना भोगाव्या लागत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी  'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी आज संवाद साधला. ते म्हणाले की, मजुरांना काम देण्यासाठी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. आता स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीनं काम सुरू झालं आहे. घरी परतणाऱ्या मजुरांना काम मिळावं म्हणून वेगवेगळ्या राज्यात उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. कोरोनाच्या काळातही मन की बात सुरूच राहिली. आता अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. श्रमिक रेल्वे, विमान सेवा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आता अधिक सर्तक राहण्याची गरज आहे. देशात कोरोनाविरोधातील लढाई मजबूत लढवली जात आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

मोदी यावेळी म्हणाले की, मागील काही वर्षात विकासाच्या दृष्टीनं भरपूर काम झालं आहे. आत्मनिर्भर भारत अभियान या दशकात भारताला नव्या उंचीवर घेऊन जाईल. मेक इन इंडियासह अनेक जण उद्योग सुरू करत आहे.

नाशिकच्या राजेंद्र जाधवांचा मोदींकडून उल्लेख

आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या राजेंद्र जाधव या शेतकऱ्याचा उल्लेख केला. नाशिकच्या सटाणा येथील राजेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरच्या मदतीनं सॅनिटायझेशन मशीनची निर्मिती केली आहे. आपल्या गावाला कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांनी स्व खर्चातून सॅनिटायझेशन मशीन बनवली आहे. याबाबत मोदी यांनी जाधव यांचं कौतुक केलं. भारतात कोरोनाविरोधात सर्वजण प्रयत्न करत आहेत. देशातील वेगवेगळ्या भागात लोक स्वतःला सेवेत वाहून घेत आहेत. जे या कामात स्वतःला गुंतवून ठेवत आहेत. त्यांना कसलाही दुसरा विचार सतावत नाही. वेळेमुळे अनेक संस्था, व्यक्ती आणि सेवा करणाऱ्यांची नाव घेऊ शकत नाही, असं मोदी म्हणाले.

रेल्वेचे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाही श्रमिकांना घरी सोडत आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. सोशल मीडियावर अनेक दृश्य पाहत आहे. दुकानदारही खबरदारी घेत आहे. फिजिकल डिस्टन्स पाळलं जावं म्हणून अनेक युक्त्या लढवल्या जात आहे. कोरोनाच्या विरोधात हे खूप वेगळं आहे, असं ते म्हणाले.

माय लाईफ माय योग स्पर्धा


यावेळी मोदी यांनी एका अनोख्या योग स्पर्धेची घोषणा केली. जागतिक योग दिवस जवळ येत आहे. भारतानं जगभरात योग पोहोचवला. योग मंत्रालयानं एक ब्लॉग सुरू केला आहे. माय लाईफ माय योग. त्यातून स्पर्धा घेण्यात येणार असून, योग केल्यामुळे आयुष्यावर काय परिणाम झाला, हे तीन मिनिटाच्या व्हिडीओतून सांगायचं आहे, असं मोदी यांनी सांगितलं.