नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज  31 मे रोजी देखील ते 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. देशभरात दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. आजच्या मन की बात कार्यक्रमातून नरेंद्र मोदी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करतील, अशी शक्यता होती, मात्र त्यापूर्वीच काल शनिवारी केंद्रानं पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊनची नियमावली जारी केली. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी कोणत्या विषयावर बोलणार याकडे देशवासियांचं लक्ष लागलं आहे.


मोदी सरकारच्या दुसऱ्या इंनिंगची एक वर्षपूर्ती

काल मोदी सरकारच्या दुसऱ्य़ा इनिंगचं एक वर्ष पूर्ण झालं. यासंदर्भात आज 'मन की बात' कार्यक्रमातून नरेंद्र मोदी आपल्या सरकारचं यश आणि कामगिरीबाबत माहिती देऊ शकतात. मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या एक वर्षात तिहेरी तलाक बिल, जम्मू-कश्मीर विशेष दर्जा, 10 मोठ्या बॅंकांचं विलनीकरण, नागरिकता संशोधन कायदा लागू करणे असे काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.   कोरोना संकटात देखील अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. याबाबत पंतप्रधान मोदी हे आज चर्चा करतील अशी शक्यता आहे.

देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढला

देशातला लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर हा लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध  टप्प्याटप्याने कमी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात 8 जूननंतर अटींसह धार्मिक स्थळे, हॉटेल रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल टप्प्याटप्यानं सुरु होणार आहेत. कर्फ्युची वेळ कमी करण्यात आली आहे. रात्री 9 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यु असणार आहे. शाळा, कॉलेज शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबतचा निर्णय जुलै महिन्यात घेतला आहे. सर्व बाबी पडताळून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कटेंनमेंट झोनच्या सीमा निश्चित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. लॉकडाऊन 5 ला 'अनलॉक 1' असं नाव देण्यात आलं आहे. कटेंनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे.

मागील 26 एप्रिलच्या मन की बातमध्ये मोदी यांनी संकटाच्या काळात भारतानं जगाला आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवलं असल्याचं म्हटलं होतं. पुढच्या 'मन की बात' पर्यंत जगात कोरोनाबाबत दिलासा मिळाल्याची बातमी मिळेल, असा विश्वास देखील मोदी यांनी व्यक्त केला होता.  संपूर्ण जग कोरोनाविरोधात एकवटलं आहे. जेव्हा भविष्यात याची चर्चा होईल, तेव्हा भारतातील जनतेनं याविरोधात कसा लढा दिला, याची दखल घेतली जाईल. लॉकडाऊनच्या काळात देश कसा एकजूट झाला. लॉकडाऊच्या काळात प्रत्येकजण आपापल्या परीनं लढत आहे. सफाई कर्मचाऱ्यांपासून ते पोलिसांपर्यत सगळ्यांचा जनतेच्या मनातील आदर वाढला आहे. कोरोनाच्या काळात सगळेचं झोकून देऊन काम करत आहेत. देशवासियांच्या या भावनेला मी नमन करतो, असं मोदींनी म्हटलं होतं.