नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ई-रुपी (e-RUPI) लाँच केलं आहे. कॅशलेस पेमेंटला प्रोत्साहन देणे हे ई-रुपीचे उद्दिष्ट आहे. आर्थिक सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर ई-रुपी विकसित केले आहे.


पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले की, देशातील डिजिटल व्यवहार, डीबीटी अधिक प्रभावी करण्यासाठी ई-रुपी व्हाउचर मोठी भूमिका बजावणार आहे. केवळ सरकारच नाही, जर कोणतीही सामान्य संस्था किंवा संघटना एखाद्याच्या उपचारात, शिक्षणात किंवा इतर कोणत्याही कामासाठी मदत करू इच्छित असेल तर ते रोख पैशांऐवजी ई-रुपी देऊ शकतील. यामुळे दिलेला पैसा त्याच कामासाठी वापरला जाईल ज्यासाठी ती रक्कम दिली गेली आहे.


पीएम मोदींनी विरोधकांवर लक्ष्य साधताना म्हटले की, पूर्वी आपल्या देशात काही लोक असं म्हणत असत की तंत्रज्ञान ही केवळ श्रीमंतांची गोष्ट आहे. भारत हा गरीब देश आहे, तर भारतासाठी तंत्रज्ञानाचा काय उपयोग आहे. जेव्हा आमचे सरकार तंत्रज्ञानाला मिशन बनवण्याविषयी बोलत असे, तेव्हा अनेक राजकारणी, विशिष्ट प्रकारचे तज्ज्ञ त्यावर प्रश्न विचारत असत. पण आज देशाने त्या लोकांचा विचार नाकारला आहे आणि त्यांना चुकीचे देखील सिद्ध केले आहे. आज देशाचा विचार वेगळा आणि नवीन आहे. आज आपण तंत्रज्ञानाकडे गरीबांना, त्यांच्या प्रगतीला मदत करण्याचे साधन म्हणून पाहत आहोत.


काय आहे  e-RUPI? 


e-RUPI हे आर्थिक व्यवहारांचे एक कॅशलेस माध्यम आहे. ही एक क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग आधारित ई-व्हाऊचर व्यवस्था आहे. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला जातो. त्यासाठी क्रेडिट कार्ड वा डेबिट कार्डचीही गरज नसेल.


नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर  e-RUPI या सेवेची सुरुवात केली आहे. त्यासाठी अर्थ विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची मदत घेण्यात आली आहे. e-RUPI वापर हा केंद्र सरकारच्या अनेक योजनांसाठी केला जाऊ शकतो. त्यामध्ये आरोग्य विभागाच्या अनेक योजना आहेत, लाभार्थ्यांना अनुदान देण्याच्या योजना आहेत तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारीही याचा वापर करु शकतात. 


अशा पद्धतीने व्हाऊचर दिले जातील


e-RUPI ची व्हाऊचर सेवा हे बँकाच्या माध्यामातून देण्यात येणार आहे. ज्या एखाद्या लाभार्थ्याला याचा लाभ द्यायचा असेल तर त्याची ओळख ही मोबाईल क्रमांकावरुन पटवण्यात येईल. लाभार्थ्याची ओळख पटल्यानंतर सरकारकडून सर्व्हिस प्रोव्हायडर बँकेला त्या लाभार्थ्याच्या नावाने e-RUPI व्हाऊचर देण्यात येईल. या e-RUPI व्हाऊचरची सेवा केवळ लाभार्थ्याच्या नावे असेल आणि केवळ त्याच्यापर्यंतच पुरवण्यात येणार आहे. 


e-RUPI चे फायदे


अमेरिकेतील एज्युकेशन व्हाऊचरच्या धर्तीवर भारतात e-RUPI व्हाऊचरची सुरुवात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मते, e-RUPI मुळे कल्याणकारी योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांला मिळणार असून त्यामध्ये कोणतेही लिकेज राहणार नाही. या व्हाऊचरच्या माध्यमातून मदर अॅन्ड चाईल्ड वेलफेयर स्कीम्स, टीबी निर्मुलन कार्यक्रम, आयुष्यमान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजना, इतर औषधे आणि अन्नधान्य अनुदान योजना अशा अनेक योजनांचा फायदा थेट लाभार्थ्याला देण्यात येणार आहे.  खासगी उद्योग हे आपल्या एम्प्लॉई वेलफेयर आणि कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कार्यक्रमामध्ये या e-RUPI डिजिटल व्हाऊचरचा वापर करु शकतात असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. 


संबंधित बातम्या :