PM Modi: काही दिवसांवर आलेल्या G-20 परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) पीटीआय वृत्तसंस्थेला विशेष मुलाखत दिली आहे, यात त्यांनी देशातील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. केंद्रात सलग नऊ वर्ष भाजपची सत्ता आहे आणि त्यामुळे देशात अनेक सुधारणा झाल्या, देशाचा विकास झाला, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. G-20 परिषदेवरही पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं आहे.


"नऊ वर्षांच्या सलग राजकीय कारकिर्दीमुळे देशाचा विकास"


नऊ वर्षांच्या राजकीय स्थैर्यामुळे, सलग राजकीय कारकिर्दीमुळे देशात अनेक सुधारणा झाल्या आहेत, देशाचा विकास झाला आहे, असं मोदी म्हणाले. बेजबाबदार धोरणं आणि वाद निर्माण केल्याने गरिबांवर परिणाम होतो, असं मोदी म्हणाले. जागतिक चलनवाढीचा सामना करण्यासाठी धोरणात्मक भूमिकेची गरज आहे, वेळेवर भमिका घेणं आणि स्पष्ट संवाद ठेवणं महत्त्वाचं असल्याचं मोदी म्हणाले.


"एका देशातील महागाईचा परिणाम इतर देशांवर होणार नाही"


महागाई ही जगासमोरील प्रमुख समस्या आहे, असं मोदी म्हणाले. G20 अध्यक्षांनी अशा काही धोरणांना मान्यता दिली आहे, ज्यामुळे एका देशातील महागाईचा परिणाम इतर देशांवर होणार नाही, असं मोदी म्हणाले. भारताच्या G-20 च्या अध्यक्षपदामुळे तिसऱ्या जगातील देशांमध्येही विश्वासाची बीजं पेरली जात असल्याचं ते म्हणाले.


"भारत आता इतर देशांसाठी आव्हान"


एकेकाळी केवळ एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहिला जाणारा भारत देश आता इतर देशांसाठी जागतिक आव्हान बनल्याचं मोदी म्हणाले. भारताच्या G20 अध्यक्षपदाची थीम 'वसुधैव कुटुंबकम' ही केवळ घोषणा नसून आपल्या सांस्कृतिक आचारसंहितेतून घेतलेलं सर्वसमावेशक तत्त्वज्ञान असल्याचंही मोदी म्हणाले. G-20 च्या वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 1.5 कोटींहून अधिक भारतीयांचा सहभाग आहे, असं मोदी म्हणाले.


"आफ्रिकेसारख्या देशाला G-20 परिषदेत महत्त्वाचं स्थान"


सर्वात उपेक्षितांना संबोधित करण्याचा देशांतर्गत दृष्टीकोन आपल्याला जागतिक स्तरावर देखील मार्गदर्शन करत आहे, असं मोदींनी म्हटलं. G-20 मध्ये आफ्रिकेला आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे, असं मोदी म्हणाले. कारण प्रत्येकाचा आवाज ऐकल्याशिवाय भविष्यातील कोणतीही योजना यशस्वी होऊ शकत नाही, हे मोदींचं मत आहे. दिल्लीबाहेरील इतर राज्यांतील लोकांना विश्वास नव्हता की, भारत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बैठका यशस्वीपणे आयोजित करू शकतो, पण ते आपण शक्य करुन दाखवल्याचं मोदी म्हणाले.


पाकिस्तान आणि चीनचा आक्षेप मोदींनी फेटाळला


पंतप्रधान मोदींनी काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जी-20 बैठका घेण्याबाबतचा पाकिस्तान आणि चीनचा आक्षेप फेटाळून लावत भारताच्या प्रत्येक भागात बैठका घेणं नैसर्गिक आहे, असं म्हटलं आहे. तर रशिया-युक्रेन युद्धावर बोलताना मोदी म्हणाले, विविध ठिकाणी विविध संघर्ष सोडवण्याचा एकमेव मार्ग संवाद आणि मुत्सद्दीपणा आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


PM Modi: भारतात 2047 पर्यंत भ्रष्टाचार अन् जातीवादाला स्थान नसेल; PTI च्या विशेष मुलाखतीत नेमकं काय म्हणाले मोदी?