नवी दिल्ली : 3 मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपल्यानंतर काय? हा प्रश्न देशातील प्रत्येक नागरिकाला पडला आहे. याबाबत आज पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत. 3 मे ही दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोन मध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोना विषयावर ही चौथी व्हिडीओ कॉन्फरन्स होती. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा. पुढे चालून रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील याबाबत धोरण ठरवावं लागेल. मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा.संक्रमित व्यक्तींचे जास्तात जास्त संपर्क तपासा, असंही ते म्हणाले.

PM Modi | कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार हे समजून धोरणं ठरवा : पंतप्रधान मोदी

कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा, असं देखील पंतप्रधान मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. 'दो गज दूरी' हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनवा, असंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

यावेळी मोदी म्हणाले की, एका बाजूला आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरु करायचे आहे. कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे 20 देश यामध्ये भारताबरोबर होते. आज 7 ते 8 आठवड्यांनी भारताच्या तुलनेत या देशांमध्ये 100 पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. कितीतरी मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आपण योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली, जनतेने देखील साथ दिली त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतोय, असं ते म्हणाले. पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला 21 दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशात अनेक लॉक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणावयाचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे, त्यांना लगेच चाचण्या करून क्वॉरंटाईन करायचे आहे. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे, असं ते म्हणाले.

मोदींच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समधील महत्वाचे मुद्दे

  • 3 मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोन मध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

  • संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल.त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा.

  • पुढे चालून रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी

  • मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा.संक्रमित व्यक्तींचे जास्तात जास्त संपर्क तपासा.

  • सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळेच म्हटली पाहिजेत

  • येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज.

  • ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका

  • कोरोनाशिवाय जे इतर आजारांचे रोगी आहेत त्यांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात ढिलाई नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरु राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले पाहिजेतच.

  • ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार . २० एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत ते अभ्यासा.

  • रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोन मध्ये कसे जायचे याचा नियोजन आवश्यक आहे.

  • हीच सुसंधी आहे सुधारणा घडविण्याची. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपदधर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल.

  • प्रत्येक राज्याने रिफॉर्म्सवर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला

  • तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता.