नवी दिल्ली : कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. 'दो गज दूरी' हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण बनवा, असं देखील पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोना विषयावर ही चौथी व्हिडीओ कॉन्फरन्स होती. प्रत्येक कॉन्फरन्समध्ये काही राज्यांना बोलण्याची संधी मिळाली. जी राज्ये राहिली होती त्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाविषयक त्यांच्या राज्यात काय काय उपाययोजना सुरु आहेत ते सांगण्याची संधी आज मिळाली. महाराष्ट्राने यापूर्वीच्या तीन कॉन्फरन्समध्ये आपल्या उपाययोजनांची माहिती दिली होती.
यावेळी मोदी म्हणाले की, एका बाजूला आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरु करायचे आहे. कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे 20 देश यामध्ये भारताबरोबर होते. आज 7 ते 8 आठवड्यांनी भारताच्या तुलनेत या देशांमध्ये 100 पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. कितीतरी मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत. आपण योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली, जनतेने देखील साथ दिली त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतोय, असं ते म्हणाले. पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला 21 दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे, असंही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशात अनेक लॉक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणावयाचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे, त्यांना लगेच चाचण्या करून क्वॉरंटाईन करायचे आहे. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे, असं ते म्हणाले.
PM Modi | कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार हे समजून धोरणं ठरवा : पंतप्रधान मोदी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Apr 2020 02:15 PM (IST)
पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोना विषयावर ही चौथी व्हिडीओ कॉन्फरन्स होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -