बंगळुरू: कर्नाटकच्या निवडणूका जसजशा जवळ येत आहेत तसतशा त्या ठिकाणच्या राजकीय हालचाली वाढत आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज कर्नाटकातील 10-लेन बंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्गाचे (Bengaluru-Mysuru Highway) उद्घाटन केले. या प्रकल्पामध्ये राष्ट्रीय महामार्ग-275 च्या बंगळुरू-निदाघट्टा-म्हैसूर विभागाच्या सहा पदरी कामाचा समावेश आहे. 119 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प एकूण 8,480 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. कर्नाटकच्या जनतेने जे प्रेम दिलं आहे त्याची व्याजासह परतफेड करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. 


उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी सभेला संबोधित केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, आज कर्नाटकातील जनता मला आशीर्वाद देत आहे. कर्नाटकात डबल इंजिनचे सरकारच्या माध्यमातून विकास साध्ये केला जात आहे. आज देशभरात बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस वेची चर्चा होत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, डबल इंजिन सरकार कर्नाटकच्या जनतेच्या प्रेमाची व्याजासह परतफेड करेल. या एक्स्प्रेस वेच्या उद्घाटनाचा आज देशातील तरुणांना अभिमान वाटत आहे. देशात असे आणखी एक्स्प्रेस वे बांधले जातील. आता बंगळुरू ते म्हैसूर प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी झाला आहे.


 






बंगळुरू-म्हैसूर द्रुतगती महामार्गाच्या बांधकामामुळे चार रेल्वे ओव्हरब्रिज, नऊ महत्त्वाचे पूल, 40 छोटे पूल आणि 89 अंडरपास आणि ओव्हरपास विकसित होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 


म्हैसूर-कुशालनगर दरम्यानच्या चौपदरी महामार्गाचे भूमिपूजनही पंतप्रधान मोदींनी केले. 92 किलोमीटर लांबीचा हा रस्ता प्रकल्प सुमारे 4,130 कोटी रुपये खर्चून विकसित केला जाणार आहे. कुशलनगरची बंगळुरूशी कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यात हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल आणि त्यांच्यामधील प्रवासाचा वेळ पाच तासांवरून केवळ अडीच तासांपर्यंत कमी करण्यासाठी मदत करेल.


काय आहे बंगळुरू-म्हैसूर हायवे प्रकल्प? 


NH-275 बेंगळुरू-निदाघट्टा-म्हैसूर विभागतील सहा लेन असलेला आणि 118 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प सुमारे 8,480 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने विकसित करण्यात आला आहे. यामुळे बंगळुरू आणि म्हैसूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ तीन तासांवरून 75 मिनिटांपर्यंत कमी होईल.


पंतप्रधानांनी म्हैसूर-कुशालनगर चार लेन महामार्गाची पायाभरणीही केली. सुमारे 4130 कोटी रुपये खर्चून 92 किलोमीटरचा हा प्रकल्प विकसित केला जाणार आहे. हे कुशलनगरची बेंगळुरूशी जोडणी वाढवण्यास मदत करेल. प्रवासाचा वेळ पाच वरून केवळ 2.5 तासांपर्यंत कमी केला जाईल.