मुंबई: लंडन ते मुंबई विमान प्रवासावेळी एअर इंडियाच्या विमानात एक धक्कादायक घटना घडली. एका भारतीय-अमेरिकन नागरिकाने या विमानात धुम्रपान केलं आणि इतर प्रवाशांसोबत गैरवर्तन केलं. तसेच विमानाचा दरवाजाही उघडण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीवर आता मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


एका 37 वर्षीय भारतीय-अमेरिकन नागरिकावर मुंबईतील सहार पोलीस ठाण्यात फ्लाईटमध्ये बाथरूममध्ये धुम्रपान आणि इतर प्रवाशांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आयपीसी कलम 336 आणि कलम 22, 23 आणि कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एअर इंडियाच्या क्रू मेंबरने पोलिसांना सांगितले की, फ्लाईटमध्ये धुम्रपान करण्यास मनाई आहे आणि जेव्हा तो व्यक्ती बाथरूममध्ये गेला तेव्हा अलार्म वाजायला लागला. आम्ही सर्व कर्मचारी बाथरूमच्या दिशेने धावलो आणि त्याच्या हातात सिगारेट असल्याचे पाहिले. आम्ही लगेच त्याच्या हातातून सिगारेट काढून घेतली. त्यानंतर त्या व्यक्तीने आमच्या सर्व क्रू मेंबर्सवर ओरडण्यास सुरुवात केली. नंतर कसा तरी त्याला पकडून सीटवर बसवले, काही वेळाने आरोपी रमाकांत फ्लाइटच्या दरवाजाजवळ गेला आणि त्याने तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या वागण्याने विमानातील सर्व प्रवासी घाबरले. सर्व प्रवाशांच्या सुरक्षा लक्षात घेता आम्ही त्याचे हातपाय बांधले आणि त्याला जागेवर बसवले. 


यानंतरही तो व्यक्ती शांत बसला नाही. त्या व्यक्तीने स्वतःचे डोके समोरच्या सीटवर आपटण्यास सुरू केले. त्यानंतर मग या फ्लाईटमध्ये कोणी डॉक्टर आहे का याची विचारणा क्रू मेंबर्सनी केली. त्यावर एक डॉक्टर असलेली व्यक्ती समोर आली आणि त्याने आरोपीला तपासले. त्यावर आरोपीने सांगितले की त्याच्या बॅगमध्ये एक गोळी आहे, ती देण्यात यावी. यावर त्याची बॅग तपासली असता त्यात कोणतीही गोळी नव्हती, त्यात फक्त एक ई-सिगारेट सापडलं. 


विमान उतरल्यानंतर आरोपीला सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी मूळचा भारतीय आहे परंतु तो अमेरिकेचा नागरिक आहे आणि त्याच्याकडे यूएस पासपोर्ट आहे.


आरोपीने हे कृत्य करताना तो मद्यधुंद अवस्थेत होता की मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता, हे शोधण्यासाठी त्याचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले असल्याचे पोलिसांनी सांगितले.


एअर इंडियाचे निवेदन 


लंडन-मुंबई चालवणार्‍या 10 मार्च 2023 रोजीच्या एअर इंडिया फ्लाइट AI130 मधील एक प्रवासी शौचालयात धुम्रपान करताना आढळला.  त्यानंतर वारंवार चेतावणी देऊनही तो बेजबाबदार आणि आक्रमकपणे वागला. विमान मुंबईत आल्यानंतर त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.  नियामकाला घटनेची रितसर माहिती देण्यात आली आहे.  सध्या सुरू असलेल्या तपासात आम्ही सर्व सहकार्य करत आहोत.  एअर इंडिया प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही वर्तनासाठी शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबते.


ही बातमी वाचा: