बचत खात्यातून आठवड्याला काढता येणाऱ्या रकमेची मर्यादा 20 फेब्रुवारीपासून 50 हजार इतकी करण्यात येणार आहे. सध्या आठवड्याला खात्यातून 24 हजार रुपये काढता येतात. 13 मार्चपासून ही मुदत पूर्णपणे उठवण्यात येईल.
27 जानेवारीला 9.92 लाख कोटी रुपये चलनात असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.
एक फेब्रुवारीपासून बचत खात्यातून प्रत्येक दिवशी 24 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. आठवड्याला मात्र खात्यातून 24 हजार रुपयेच काढता येणार होते. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांना दिलासा देत आरबीआयने चालू खात्यावरील सर्व निर्बंध मागे घेतल्याची घोषणा केली होती.
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनातील तत्कालीन नोटा बाद केल्या. नागरिकांना त्यांच्याकडील जुन्या नोटा बँकेत परत करण्यास किंवा बदलण्यास 30 डिसेंबर 2016 पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
नव्या नोटांच्या तुटवड्यामुळे एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर एटीएम आणि बँकाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.