नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशातील 3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट उद्ध्वस्त केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन बोलताना सांगितलं. देशाच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील कामांची माहिती दिली.

पंतप्रधान म्हणाले की, ''सरकार सत्तेत आल्यानंतर काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सर्वात आधी एसआयटीची स्थापना केली. त्या एसआयटीने गेल्या तीन वर्षात सव्वा लाख कोटी काळा पैसा बाहेर काढला''

नोटाबंदीबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ''नोटाबंदीनंतर जी माहिती संकलित झाली. त्यावरुन असं समजलं की, देशातील 3 लाख कंपन्या अशा आहेत. ज्यांचा काळा बाजार, हवाला रॅकेट आदीच्या माध्यमातून लाखोंचे आर्थिक व्यवहार सुरु आहेत. आतापर्यंत अशा पावणे दोन लाख कंपन्यांना सरकारनं टाळं ठोकलं आहे.''

ते पुढे म्हणाले, ''या तीन लाख कंपन्यांपैकी काही कंपन्या अशाही आहेत, ज्यांनी दिलेल्या पत्त्यावर 400 कंपन्या सुरु आहेत. हे सर्व एकमेकाच्या संगनमतानं सुरु होतं. त्याकडं पाहणारं कुणी नव्हतं. पण आता असे काळा धंदा करणाऱ्यांवर सरकारनं कडक कारवाई सुरु केली आहे.''

नोटाबंदीच्या यशस्वीतते याबद्दल बोलतान पंतप्रधान म्हणाले की, ''नोटाबंदीच्या काळात जवळपास 3 लाख कोटी बँकिंग क्षेत्रात आले. यातील जवळपास पावणे दोन लाख कोटी रुपये ज्या खात्यांमध्ये भरले होते, त्यातील व्यवहार संशयास्पद आहेत. यातील 18 लाख लोकांची ओळख पटवण्यात आली असून, त्याचं वर्षिक उत्त्पन्न आणि सादर केलेला ताळेबंद यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे याबद्दल त्यांच्याकडून उत्पन्नाचा सर्व तपशील मागवला आहे. विशेष म्हणजे, यातील 1 लाख लोक असेही आहेत, ज्यांनी आयुष्यात एकदाही कर भरला नव्हता.''

महत्त्वाचे मुद्दे

  • तीन वर्षात सव्वा लाख कोटी काळा पैसा SIT मार्फत बाहेर काढला

  • नोटांबंदीच्या काळात तीन लाख कोटी बँकिंग क्षेत्रात आला

  • पावणे दोनलाख कोटी रुपये संशयाच्या घेऱ्यात

  • नोटांबदीच्या काळात दोन लाख कोटी काळा पैसा जमा

  • 1 एप्रिल ते 5 ऑगस्ट नवे आयकरदाते 56 लाख. गेल्या वर्षी ही संख्या 22 लाख होती.

  • 18 लाख लोकांची संपत्ती उत्पन्नापेक्षा अधिक. त्यांच्याकडून कारण मागवलं.

  • 1 लाख नवे आयकरदाते समोर आले.

  • 3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट समोर, पावणे दोन लाख कंपन्यांची नोंदणी रद्द केली.