नवी दिल्ली : देशात संवेदनशील समाज बनवण्याची गरज आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांशी संवाद साधला. राष्ट्रपतीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना उद्देशून पहिल्यांदाच भाषण केलं.
यावेळी त्यांनी देशातील विविध मुद्द्यांना हात घातला. शिवाय, स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासालाही उजाळा दिला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘न्यू इंडिया’च्या स्वप्नाचाही उल्लेख केला. राष्ट्रपती कोविंद म्हणाले, “न्यू इंडिया बनवण्याचं ध्येय हा राष्ट्रीय संकल्प व्हायला हवा.”
राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात स्वच्छ भारत अभियानाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “सरकारने स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे. मात्र, देशाला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सरकार केवळ कायदे बनवून लागू करु शकतं. मात्र, त्या कायद्यांचं पालन करणं सर्वांची जबाबदारी आहे.”
जीएसटी, नोटाबंदी या मुद्द्यांचाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. जीएसटी आणि नोटाबंदीच्या यशासाठी देशातील जनतेच्या योगदानाचंही कौतुक राष्ट्रपतींनी केलं.
देशात मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जाणार नाही, असा समाज निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिवाय, सरकारने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियान सुरु केले आहे. त्याद्वारे मुलींना सशक्त बनवा, असं आवाहनही त्यांनी केले.