पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पाटणा विद्यापीठाच्या शतकमहोत्सावात कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना, त्यांनी जगातल्या टॉप 500 विद्यापीठांच्या यादीत देशातील कोणत्याही विद्यापीठाचं नाव नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. तसेच हे चित्र बदलण्यासाठी देशातील निवडक 20 विद्यापीठांसाठी 10 हजार कोटी देण्याची घोषणा केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “केंद्र सरकारने त्रयस्थ संस्थेद्वारे निकष पडताळणी करुन, समोर आलेल्या देशातल्या टॉप 20 विद्यापीठांना सरकारी बंधनातून मुक्तता करेल. तसेच त्या विद्यापीठांना आगामी पाच वर्षात वर्ल्ड क्लास विद्यापीठ बनवण्यासाठी 10 हजाराचे आर्थिक सहाय्यही देईल. यात खासगी 10 आणि सरकारी 10 विद्यापीठांचा समावेश असेल.”

पंतप्रधानांनी यावेळी पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागणीचाही आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, “केंद्रीय विद्यापीठ हा भूतकाळ होता. मी त्याऐवजी भविष्याचा विचार करत आहे. आणि त्याचच निमंत्रण देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित आहे.”

मोदी पुढे म्हणाले की, “आपल्या देशात शिक्षण क्षेत्राचा विकास कासव गतीने होत आहे. तसेच आपल्या शिक्षण पद्धतीतही अनेक मतभेद आहेत. त्यामुळेच शिक्षण क्षेत्रातील विशेष करुन उच्च शिक्षणातील बदलांमध्ये आपलं सरकार कुचकामी ठरत आहेत.”

शिक्षण विभागातील बदलांसदर्भात केंद्र सरकारच्या पुढाकरांबद्दल माहिती देताना मोदी म्हणाले की, “केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदलांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यासाठी पहिल्यांदाच आयआयएमसारख्या संस्थांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करुन प्रोफेशनल पद्धतीनं काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं. पाटणा विद्यापीठालाही अशाच प्रकारे स्वायत्त काम करण्यासाठी त्याबाबतचं निमंत्रण देण्यासाठी आज इथं उपस्थित आहे. केंद्र सरकारने देशातील विद्यापीठांसाठी एक नवीन योजना तयार केली आहे.”

पंतप्रधान पुढे म्हणाले की, “ज्या भूमीवर नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला सारखी 1300 ते 1700 वर्ष जुनी विद्यापीठे आहेत. आणि ही साऱ्या जगाला आकर्षित करत आहेत. तरीही जगातल्या टॉप 500 विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. आपल्याला ही ओळख पुसली पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकार एकूण 20 निवडक विद्यापीठांना वर्ल्ड क्लास बनवण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक सहाय्य देईल.”

या विद्यापीठांच्या निवडीबद्दल सांगताना मोदी पुढं म्हणाले की, “या विद्यापीठांची निवड कोणत्याही राजकीय नेत्याच्या, किंवा पंतप्रधानांच्या इच्छेप्रमाणे आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्राद्वारे होणार नाही. तर एखाद्या त्रयस्थ संस्थेकडून विद्यापीठाच्या निकषाची पडताळणी करुनच, टॉप 10 सरकारी विद्यापीठ आणि टॉप 10 खासगी विद्यापीठांची निवड होईल.”

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, “पटना विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यापेक्षा, त्याची क्षमता मोठी आहे. पटना विद्यापीठाकडे ही सर्वात मोठी संधी आहे. या संधीचं पाटना विद्यापीठाने सोनं केलं पाहिजे. आणि याचंच निमंत्रण देण्यासाठी मी आज या कार्यक्रमाला उपस्थित झालो आहे.”