PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0' आणि 'अमृत 2.0'चा शुभारंभ करण्यात आला आहे. या दरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 2014 मध्ये देशवासियांनी भारताला हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला होता. 10 कोटींहून अधिक शौचालयं तयार करण्यासोबतच देशवासियांनी हा संकल्प पूर्ण केला. आता 'स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0'चं लक्ष्य गार्बेज फ्री शहर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून पूर्णपणे मुक्त शहर तयार करणं आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0' आणि 'अमृत 2.0' या दोन नव्या उपक्रमांमुळे देशातील वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना करणे शक्य होईल. यामुळे शहरे हे अधिक उत्तम होतील. आगामी काळात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवरून 100 टक्क्यापर्यंत नेण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.


नद्यांमध्ये सांडपाणी टाकलं जाणार नाही, याची काळजी घ्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मिशन अमृतच्या पुढच्या टप्प्यात देशाचं लक्ष्य सीवेज आणि सेप्टिक मॅनेजमेंट वाढवणं, आपल्या शहरांना वॉटर सिक्योर सिटीज करणं आणि आपल्या नद्यांमध्ये सांडपाणी जाणार नाही याची काळजी घेणं, हे असणार आहे. स्वच्छ भारत अभियान आणि अमृत मिशनचा आतापर्यंतचा प्रवास प्रत्येक भारतीयाची मान गर्वानं उंचावणारी होती. यामध्ये ध्येय आहे, मान आहे, मर्यादा आहे आणि एक महत्त्वाकांक्षा आणि मातृभूमीसाठी अप्रतिम प्रेमही आहे."


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असमानता दूर करण्याचे एक उत्तम माध्यम म्हणून शहरी विकासावर विश्वास होता. चांगल्या आयुष्याच्या आकांक्षेत गावांमधून बरेच लोक शहरांमध्ये येतात. आम्हाला माहित आहे की त्यांना रोजगार मिळतो परंतु त्यांचे राहणीमान अगदी खेड्यांपेक्षाही खालच्या दर्जाचे राहते. त्यामुळे या लोकांची दुहेरी कुचंबणा होते. एकतर, घरापासून दूर, आणि वरून अशा परिस्थितीत राहणे. ही परिस्थिती बदलण्याचा, विषमता दूर करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बरेच प्रयत्न केले. स्वच्छ भारत मिशन आणि मिशन अमृतचा पुढील टप्पा देखील बाबासाहेबांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे."