नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरण प्रमाणपत्रावर (Corona Vaccination) पंतप्रधान मोंदीचा (PM Narendra Modi) फोटो असल्याचे दिसून येते. त्यामुळे केवळ लसीकरणाचे श्रेय घेत असाल तर मृत्यूंची जबाबदारीही घ्या' अशी टीका राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी केली होती. यावर भाजप खासदार डॉ सुजय विखे पाटील (Dr Sujay Vikhe Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  देशातील लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवर आक्षेप घेतला जात असेल तर राज्यात घटलेल्या घटनांमध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो छापायचा का? असा सवाल सुजय विखे यांनी केला आहे. 


एबीपी माझाशी बोलताना सुजय विखेंनी म्हटलं आहे की, महाविकासआघाडीचं काम तर कौतुकास्पदच आहे. त्या तिघांना प्रत्येकाला एकेक भारतरत्न दिला पाहिजे. यांच्या लसीबाबतच्या ग्लोबल टेंडरला एक खरेदीदार नाही मिळाला.  जे जे प्रतिनिधी डॉक्टर नाहीत त्यांनी किमान अभ्यास करून बोलावं. अहमदनगरमध्ये झालेल्या अग्नितांडवात ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या डेथ सर्टिफिकेटवर मग मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का? एसटी कर्मचारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यावर उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असं विखे म्हणाले. राजकारण करायला लागला तर आम्ही जशास तसे उत्तर द्यायला कमी पडणार नाही. सरकारच्या कामगिरीनुसार फोटो छापायला लागले तर सर्वात जास्त डेथ सर्टिफिकेट वर महाविकासआघाडीचा फोटो येईल, असंही ते म्हणाले. 


एबीपी माझाशी बोलताना सुजय विखे म्हणाले की, याच्याआधी अल्फा बीटा डेल्टा व्हायरस झाले.  म्युटेशन का होतं आणि तो किती धोकादायक याच्यावर अभ्यास न करताच काही खासदार बोलले.  जोपर्यंत ग्लोबल व्हॅक्सिनेशन होत नाही तोपर्यंत त्याचे म्युटेशन होतच राहणार आहे.  प्रत्येक नवीन म्युटंटला नवी लस तयार करणे कोणालाही शक्य नाही.  दोन महिन्यानंतर अजून एखादा नवा व्हेरियंट येईल पण म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले. पूर्ण लसीकरण हेच आपलं लक्ष असले पाहिजे. केवळ ओमायक्रॉन नव्हे तर याआधीच्या व्हेरिएंटने सुद्धा लसीकरणानंतर प्रभावित केलं आहे. 



संबंधित बातम्या


'जर लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर फोटो छापता, तर मग मृत्यूंची जबाबदारीही घ्या', खा. अमोल कोल्हेंची पंतप्रधान मोदींवर आक्रमक टीका


Omicron : धक्कादायक! भारतातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाचा यंत्रणांना चकवा, दुबईला पळाला!