Cyclone Jovad : ओमायक्रॉनसोबतच आणखी एक संकट देशावर चाल करुन येत आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. या वादळाला 'जोवाड' (Jovad) (Jowad) असं नाव देण्यात आलं आहे. जोवाड चक्रीवादळ सक्रिय झाल्यामुळं दक्षिण बंगालमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, तटरक्षक दलाने समुद्रातील जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जहाजं आणि विमानांना वातावरणाबाबत इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल सरकारनं म्हटलं की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या किनारी भागात तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


जोवाड चक्रिवादळ कितपत धोकादायक? 


हवामान खात्यानं म्हटलं आहे की, अग्नेय बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी पश्चिम मध्य बंगालचा उपसागर, उत्तर आंध्र प्रदेश किनारा-दक्षिण ओदिशा किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली पूर्व मिदनापूरमध्ये एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पश्चिम मिदनापूर, झारग्राम आणि हावडा येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.


'जोवाड' नाव कसं ठेवलं? 


सौदी अरेबियाच्या सूचनेवरून या वादळाला 'जवाद' असं नाव देण्यात आले आहे. जवाद हा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ 'उदार' असा होतो. यापूर्वी आलेल्या चक्रीवादळांच्या तुलनेत या चक्रीवादळामुळे फारसा विध्वंस होणार नाही आणि सामान्य जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान,  IMD म्हणजेच, भारतीय हवामान खात्यानं म्हटलं आहे की 4 डिसेंबरच्या सकाळी वाऱ्याचा वेग ताशी 100 किमी असेल.


वादळांना नावं देण्याची सुरुवात कशी झाली?


उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळाला स्वतंत्रपणे ओळखता यावे यासाठी 2004 पासून आयएमडीच्या पुढाकाराने अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचे नामकरण करण्यास सुरुवात झाली. त्यासाठी चक्रीवादळांच्या प्रभावाखाली असणाऱ्या आठ देशांनी सुचवलेल्या एकूण 64 नावांच्या यादीचा वापर करण्यात आला. या यादीमधील सर्व नावे चक्रीवादळांना देण्यात आली.  त्यामुळे आयएमडीच्या पुढाकाराने चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी तयार करण्यात आली. या यादीमध्ये पूर्वीच्या आठ देशांसह आणखी पाच देशांनी सुचवलेल्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. बांगलादेश, भारत, इराण, मालदीव, म्यानमार, ओमन, पाकीस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, युनायटेड अरब अमिरातीज (युएई) आणि येमेन अशा 13 देशांनी सुचवलेल्या प्रत्येकी 13 नावांचा नव्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.


इंग्रजी अद्याक्षरांनुसार सर्व देशांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांनी सुचवलेली नावे 13 रकान्यांमध्ये मांडण्यात आली आहेत. नव्याने तयार होणाऱ्या चक्रीवादळाला रकान्यातील देशांच्या क्रमानुसार एका पाठोपाठ एक नाव देण्यात येईल. 13 देशांनी सुचवलेल्या पहिल्या नावांचा रकाना संपला की, दुसऱ्या रकान्यातील नावे देशांच्या क्रमवारीनुसार देण्यात येतील.


आतापर्यंतची विनाशकारी चक्रीवादळं कुठली ठरली?



  • भारतीय उपखंडात 1970 पासून 13 विनाशकारी चक्रीवादळे येऊन गेली ज्यांच्या वाऱ्यांचा वेग ताशी 200 किलोमीटरपेक्षा अधिक होता.

  • 1970 मध्ये बांग्लादेशातील चित्तगोंग मध्ये धडकलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात तीन लाख लोक मृत्युमुखी पडले होते.

  • 29 ऑक्टोबर 1999 रोजी ओडीशातील पारादीपजवळ धडकलेल्या सुपर सायक्लोन मध्ये 15 हजार नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.