PM Modi Gujrat Tour : आज सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची 148 व्या जयंती (Birth Anniversary) आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांना अभिवादन केलं. पंतप्रधान मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी (Statue of Unity) येथे पुष्पांजली अर्पण केली. नर्मदा नदीच्या काठावर बांधलेले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचा पंतप्रधान मोदी यांनी पुष्पांजली अर्पण केली.
पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यात सहभाग घेतला. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभ भाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी मेरा युवा भारत संघटनेचा शुभारंभ केला.
'मेरा युवा भारत' संघटनेचा शुभारंभ
आज सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान मोदी यांनी 'मेरा युवा भारत' संघटना लाँच केली. पंतप्रधान रविवारी 'मन की बात' कार्यक्रमात सांगितलं होतं की, 'मेरा युवा भारत' संघटना भारतातील तरुणांना विविध राष्ट्र उभारणी कार्यक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची संधी देईल. विकसित भारताच्या उभारणीत भारतातील युवाशक्तीला एकत्रित करण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. देशातील तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' हे महत्त्वाचं व्यासपीठ ठरणार आहे.
5,950 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन
गुजरात दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात 5,950 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना मदत होणार असून त्यांचा जिल्ह्याशी संपर्क वाढेल.
जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी 2013 मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीची पायाभरणी केली होती आणि पंतप्रधान झाल्यानंतर 2018 मध्ये त्यांनी जगातील सर्वात उंच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' देशाला समर्पित केला होता. हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. यासाठी सुमारे 2989 कोटी रुपये खर्च आला आहे. येथे आतापर्यंत 1.53 कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. या पुतळ्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळाल्या आणि गुजरात आणि देशातील पर्यटकांसाठी एक नवीन पर्यटनस्थळही उपलब्ध झालं.