Cold Weather : राज्यात 'ऑक्टोबर हिट'चा (Heat) तडाखा कमी होत असून पारा (Cool Temperature) घसरताना दिसत आहे. अनेक भागात उन्हाची तीव्रता कमी होत असून थंडी वाढू लागली (Cold Weather) आहे. असं असलं तरी काही भागात उन्हाची झळ बसत आहे. महाराष्ट्रात किनारी भागात तापमान वाढणार आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि ठाण्यात सकाळी हवेत गारवा जाणवत आहे, पण दुपारी मात्र उन्हाचा चटका बसत आहे, तापमान 35-36 डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मुंबईकरांना थंडीचा आनंद घेण्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.


तामिळनाडू आणि केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासात कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाने दिला आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज IMD ने व्यक्त केला आहे.


हवेतील गारवा हळूहळू वाढणार  


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी वाढत आहे. अनेक जिल्ह्यांत दुपारचे तापमान 33 अंशांच्या खाली गेल्याचं दिसून येत आहे. सातारा, कोल्हापूर आणि नागपूरमध्येही थंडीची चाहूल लागली आहे. अलीकडच्या काळात राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद जळगावात झाली असून, पारा 11.3 अंशांवर पोहोचला आहे. तर पुणे, निफाड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 15 अंशांपेक्षा कमी राहिले. राज्यात कमाल तापमानात घट होत असल्याने गुलाबी थंडी वाढू लागली आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात हळूहळू आणखी घट होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यात काही ठिकाणी रिमझिम पावसाचीही शक्यता आहे.


'या' भागात पावसाची शक्यता


राज्यातील बहुतेक भागात थंडी वाढत असून, कोकणात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. पण, या तुरळक पावसाचा हवामानावर फारसा परिणाम होणार नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


देशभरात तापमान कसं असेल?


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, ओडिशा, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, तर ईशान्येकडील राज्यांमध्ये म्हणजे मणिपूर आणि आसपासच्या परिसरात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरा. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाची शक्यता आहे. यासोबतच 1 नोव्हेंबरपासून जम्मू-काश्मीर, लेह आणि लडाखच्या पश्चिम हिमालयीन भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.