PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज गुजरातमधील (Gujrat) हजीरा येथे आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया विस्तार प्रकल्पाची पायाभरणी केली. हा प्रकल्प 60 हजार कोटी रुपयांचा आहे. या स्टील प्लांटच्या विस्तारामुळे जागतिक स्तरावर भारताचं स्थान वाढणार आहे. भारताची स्टील इंडस्ट्री जगातील सर्वात मोठं व्यापार क्षेत्र असल्याच पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. या स्टील प्लांटच्या विस्तारामुळे गुंतवणुकीसोबत अनेक नवीन शक्यताही निर्माण होतील.


गुजरातमधील हजीरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडियाच्या 60 हजार कोटी रुपये खर्चाच्या विस्तारित प्रकल्पाची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, या स्टील प्लांटच्या विस्तारामुळे गुंतवणूक होणार असून भविष्यासाठी नवीन संधींसाठी दारंही खुली होतील. त्यासोबतच पंतप्रधानांनी येथील लोकांचे अभिनंदनही केलं.






सर्वात मोठा स्टील उद्योग भारतात


पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले की, जेव्हा देशातील स्टील उद्योग मजबूत असतो, तेव्हा देशातील पायाभूत सुविधा मजबूत असतात. स्टील क्षेत्राचा विस्तार झाल्यावर रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि बंदरे यांचा विस्तार होतो. गेल्या आठ वर्षांतील सर्वांच्या प्रयत्नांमुळे भारताचा पोलाद उद्योग जगातील सर्वात मोठा पोलाद उत्पादक उद्योग बनला आहे. या उद्योगात विकासाची प्रचंड क्षमता आहे.


'जग भारताकडे मोठ्या आशेने पाहतंय'


दरम्यान, पंतप्रधान यावेळी म्हणाले की, आता जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. भारत जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक धोरणात्मक वातावरण तयार करण्यावर केंद्र सरकार काम करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितलं आहे.


भारताचं परराष्ट्रांवरील अवलंबत्व कमी होईल


पंतप्रधान यांनी म्हटलं की, पूर्वी आम्ही विमानवाहू जहाजांमध्ये (Aircraft Carrier) वापरल्या जाणार्‍या स्टीलसाठी परराष्ट्रांवर अवलंबून होतो. देशातील अर्थव्यवस्थेला चालना दिली जात आहे. त्याचबरोबर पोलाद उद्योगाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सरकार कार्यशील आहे. या स्टील प्लांटमुळे परदेशावरील भारताचं अवलंबत्व कमी होणार आहे.