PM Modi Jacket : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी (8 फेब्रुवारी) संसदेत परिधान केलेलं प्लास्टिक बाटल्यांचा (Plastic Bottles) पुनर्वापर करुन तयार केलेलं जॅकेट लवकरच सामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. हे जॅकेट (Jacket) पुढील तीन महिन्यांत प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होईल, अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (IOCL) अध्यक्ष एस एम वैद्य यांनी बंगळुरुमध्ये इंडिया एनर्जी वीक 2023 मध्ये सांगितलं.
इंडियन ऑईलच्या 'अनबॉटल' उपक्रमांतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (6 फेब्रुवारी) बंगळुरु इथे सुरु असलेल्या इंडिया एनर्जी वीक 2023 मध्ये पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या गणवेशाचं लोकार्पण केलं. यावेळी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने पंतप्रधान मोदींना निळ्या रंगाचं जॅकेट भेट दिलं जे मोदींनी काल सभागृहात परिधान केलं आणि त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मोदींचं सगळीकडे कौतुक सुरु आहे.
तीन महिन्यांच्या आत जॅकेट सर्वसामान्यांसाठी उपलब्ध : एस एम वैद्य
ANI ला दिलेल्या विशेष मुलाखतीत IOCL चेअरमन एस एम वैद्य म्हणाले की, "तीन महिन्यांच्या आत प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन बनवलेले जॅकेट सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. लोक IOCL, BPCL आणि HPCL सारख्या तेल विपणन कंपन्यांच्या (OMC) रिटेल आऊटलेटवर हे जॅकेट खरेदी करु शकतील." वैद्य म्हणाले की, प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन तयार केलेली उत्पादने केवळ तेल विपणन कंपन्या किंवा लष्कराच्या जवानांपुरते मर्यादित राहणार नाही." "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करुन तयार केलेलं जॅकेट परिधान करुन पर्यावरण वाचवण्याबाबत मोठा संदेश दिला आहे," असं एस एम वैद्य म्हणाले.
इंडिया एनर्जी वीक 2023 चं उद्घाटनात प्लास्टिक कमी वापरा, पुन्हा वापरा आणि रीसायकल करण्याचा मंत्र दिला. आपण ताज्या पॉलिमरचा वापर कसा कमी करू शकतो आणि पुनर्वापराला प्रोत्साहन कसे देऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे हे जॅकेट आहे," असं वैद्य म्हणाले. वैद्य म्हणाले की, पंतप्रधानांनी असे जॅकेट परिधान केल्याने प्लास्टिक रिसायकलिंग एका नव्या स्तरावर पोहोचेल, असा विश्वास वैद्य यांन व्यक्त केला.
तामिळनाडूच्या कंपनीने पंतप्रधानांच्या जॅकेटचे कापड तयार केले
पंतप्रधानांचे जॅकेट तयार करण्यासाठी सुमारे 15 प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी सभागृहात घातलेल्या जॅकेटसाठी वापरलेले फायबरचे कापड तामिळनाडूच्या करुर शहरातील कंपनीने तयार केलं आहे. श्री रंग पॉलिमर्स नावाच्या या कंपनीने पेट (Pet) बॉटलच्या पुनर्वापरातून बनवलेले 9 वेगवेगळ्या रंगांचे कपडे इंडियन ऑइलला पाठवले होते. त्यातून पीएम मोदींसाठी कपड्यांचा रंग निवडण्यात आला. यानंतर हे कापड गुजरातमधील टेलरकडे पाठवण्यात आले, जो पंतप्रधान मोदींचे कपडे तयार करतो. त्या टेलरने या कपड्यातून नरेंद्र मोदींचं जॅकेट तयार केलं, जे नंतर पंतप्रधानांना सादर करण्यात आलं.
कसं तयार केलं जॅकेट?
असे जॅकेट बनवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या धुतल्यानंतर त्या अगदी बारीक कापल्या जातात. यातून मिळणाऱ्या प्लास्टिक फायबरपासून धागा तयार केला जातो. या फायबरच्या धाग्याचे हातमाग यंत्राद्वारे धाग्यात रुपांतर केले जाते. यादरम्यान रंगरंगोटी करताना पाण्याचा वापर केला जात नाही. सामान्य कापडाप्रमाणे शिवून ड्रेस तयार केला जातो. जॅकेटसह संपूर्ण ड्रेस तयार करायचा असल्यास 28 प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करणं आवश्यक आहे. या प्रक्रियेतून जॅकेट तयार करण्यासाठी फक्त 2 हजार रुपये खर्च येतो.
संबंधित बातमी