PM Modi Jacket : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी (8 फेब्रुवारी) लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सुरु असलेल्या चर्चेत सहभाग घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणावर सरकारने मांडलेल्या आभार प्रस्तावावर पंतप्रधानांनी भाषण केलं. यादरम्यान त्यांनी निळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते जे फार विशेष होतं. खरंतर हे जॅकेट परिधान करुन पंतप्रधान मोदींनी संसदेत संबोधित करताना प्लास्टिकपासून पर्यावरण वाचवण्याचा संदेशही दिला. हे जॅकेट कोणत्याही कापडापासून बनवलेले नसून प्लास्टिकच्या बाटल्यांचा (Plastic Bottles) पुनर्वापर करुन तयार केलेल्या धाग्यापासून बनवलं आहे. हे जॅकेट दोन दिवसांपूर्वी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOC) पंतप्रधान मोदींना बंगळुरुमध्ये आयोजित इंडिया एनर्जी वीकमध्ये भेट दिलं होतं.


खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेलं जॅकेट असो वा सूट किंवा पगडी अथवा फेटा, त्यांचा पोशाख हा कायमच चर्चेचा विषय असतो. त्यातच आता त्यांनी संसदेत परिधान केलेल्या जॅकेटची भर पडली आहे. मोदी परिधान करत असलेल्या कपड्यांमध्ये काहीतरी उद्देश असतो. संसदेत काल परिधान केलेल्या जॅकेटमधून प्लास्टिकचा पुनर्वापर कसा करता येईल हे सांगण्यात आलं.


रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेले जॅकेट


पंतप्रधानांचे जॅकेट तयार करण्यासाठी सुमारे 15 प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या धुतल्यानंतर त्या अगदी बारीक कापल्या जातात. यातून मिळणाऱ्या प्लास्टिक फायबरपासून धागा तयार केला जातो. या फायबरच्या धाग्याचे हातमाग यंत्राद्वारे धाग्यात रुपांतर केले जाते. यादरम्यान रंगरंगोटी करताना पाण्याचा वापर केला जात नाही. सामान्य कापडाप्रमाणे शिवून ड्रेस तयार केला जातो. जॅकेटसह संपूर्ण ड्रेस तयार करायचा असल्यास 28 प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करणं आवश्यक आहे. या प्रक्रियेतून जॅकेट तयार करण्यासाठी फक्त 2 हजार रुपये खर्च येतो.


तामिळनाडूच्या कंपनीने पंतप्रधानांच्या जॅकेटचे कापड तयार केले


पंतप्रधान मोदींनी सभागृहात घातलेल्या जॅकेटसाठी वापरलेले फायबरचे कापड तामिळनाडूच्या करुर शहरातील कंपनीने तयार केलं आहे. श्री रंग पॉलिमर्स नावाच्या या कंपनीने पेट (Pet) बॉटलच्या पुनर्वापरातून बनवलेले 9 वेगवेगळ्या रंगांचे कपडे इंडियन ऑइलला पाठवले होते. त्यातून पीएम मोदींसाठी कपड्यांचा रंग निवडण्यात आला. यानंतर हे कापड गुजरातमधील टेलरकडे पाठवण्यात आले, जो पंतप्रधान मोदींचे कपडे तयार करतो. त्या टेलरने या कपड्यातून नरेंद्र मोदींचं जॅकेट तयार केलं, जे नंतर पंतप्रधानांना सादर करण्यात आलं.


आता सुरक्षा दलांचा युनिफॉर्म बनवण्याची तयारी सुरु


लवकरच सुरक्षा दलाचे जवानही प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन तयार केलेले युनिफॉर्म परिधान करु शकतात. याशिवाय इंडियन ऑईलचे कर्मचारीही या फॅब्रिकचे कपडे घालतील. यासाठी दहा कोटींहून अधिक प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर केला जाणार असून, त्यांचा कचरा दूर करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल समजलं जात आहे.


संबंधित बातमी


Budget Session : मोदींचं प्लास्टिकचं जॅकेट vs खरगेंचा 56 हजारांचा मफलर, सभागृहातील वेशभूषेनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं