PM Narendra Modi Inaugurates Statue of Equality: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज वसंत पंचमीच्या मुहुर्तावर वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांच्या 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चे अनावरण केले. रामानुजार्य यांच्या या भव्य पुतळ्यासाठी एक हजार कोटी रुपये लागलेत. हा पुतळा रामानुजाचार्य मंदिरातच स्थापन करण्यात आलेला आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी शमशाबाद येथील 'यज्ञशाळा' येथे पोहोचले. तेथील धार्मिक अनुष्ठानात ते सहभागी झाले. रामानुजाचार्य हे 11 व्या शतकातील संत आणि समाज सुधारक आहेत. त्यांचा 216 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. पंचधातूपासून बनलेला हा पुतळा जगातील सगळ्यात मोठा दुसरा पुतळा आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या पुतळ्याचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वामी रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचं लोकार्पण ही त्यांना योग्य श्रद्धांजली ठरणार आहे, असं ट्विट देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी केलं होतं.


रामानुजाचार्य यांनी राष्ट्रीयत्व, लिंग, वंश, जात किंवा पंथ या सर्वांना समान मानून लोकांच्या उद्धारासाठी अथक कार्य केले आहे. समतेच्या पुतळ्याचे अनावरण हा बारा दिवस चालणाऱ्या रामानुजन सहस्त्राब्धी समारंभाचा एक भाग आहे. रामानुजाचार्य यांच्या 1000 व्या जयंतीनिमित्त हा सोहळा सध्या सुरू आहे. वैष्णव संत रामानुजाचार्य यांची 1000 वी जयंतीनिमित्त सुरु झालेल्या या कार्यक्रमामध्ये 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत 1 हजार 35 कुंडांतून 14 दिवस महायज्ञाचा कार्यक्रम केला जाणार आहे.


रामानुजाचार्य यांनी विश्वास, जात आणि वंश यासह जीवनाच्या कोणत्याही स्तरावर समतेच्या कल्पनेचा पुरस्कार केला. पंचधातू म्हणजे सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या पंचधातूंनी रामानुजाचार्य यांचा 216 फूट उंचीचा हा पुतळा साकार झाला आहे. हा बैठक स्थितीतील पुतळा जगात सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. हा 54 फूट उंच अश्या भद्रवेदी नामक इमारतीवर उभारला आहे. त्या इमारतीमध्ये डिजिटल वैदिक ग्रंथालय व संशोधन केंद्र, प्राचीन भारतीय लिखाण, नाट्यगृह, शैक्षणिक गॅलरी आहे.  रामानुजाचार्य यांच्या पुतळ्य़ाची कल्पना रामानुजाचार्य आश्रमाचे चिन्ना जीयार स्वामी यांची आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयसीआरआयएसएटी संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, हैदराबाद जवळच्या पतंचेरूमधील, आयसीआरआयएसएटी–म्हणजेच, निम-शुष्क उष्णकाटिबंधीय प्रदेशातील कृषिपीकविषयक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेला भेट देत, या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष समारंभाचा शुभारंभ केला. तसेच, आयसीआरआयएसएटी संस्थेमधील, हवामान बदलाच्या संकटात रोपांचे संरक्षण करण्यासंदर्भातील संशोधन सुविधा आणि रॅपिड जनरेशन एडव्हॅन्समेंट- म्हणजेच, जलदगतीने होणाऱ्या पिढी संक्रमण संशोधन सुविधेचेही त्यांनी उद्घाटन केले. या दोन्ही सुविधा, आशिया आणि आफ्रिकेतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आल्या आहेत. तसेच, आयसीआरआयएसएटी च्या विशेष लोगोचे आणि या प्रसंगानिमित्त जारी करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकीटाचेही त्यांनी अनावरण केले. तेलंगणाच्या राज्यपाल, तामिळीसाई सौंदरराजन, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि जी किशन रेड्डी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.