पाकयोंग, जिथे हे विमानतळ उभारण्यात आलं आहे, तिथून पहिलं व्यावसायिक उड्डाण 4 ऑक्टोबरपासून सुरु होईल. देशातील शंभरावं आणि सिक्कीममधील पहिलं विमान उडताच इशान्य भारतातील हे राज्य देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडलं जाईल.
भारत-चीन सीमेपासून जवळपास 60 किमी अंतरावर असलेलं पाकयोंग विमानतळ 201 एकरावर आहे. समुद्रसपाटीपासून 4500 फूट उंचीवर, तर पाकयोंग गावापासून दोन किमी उंचीवर डोंगरावर स्थित हे विमानतळ आहे, अशी माहिती सिक्कीमचे मुख्य सचिव ए. के. श्रीवास्तव यांनी दिली.
थकवा आणणाऱ्या या प्रवासाचं अंतर विमानसेवेमुळे काही मिनिटांवर येणार आहे. इथून प्रवास करणं सामान्य व्यक्तीच्या आवाक्यात असावं, यासाठीही सरकारने प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे विमानतळ उडान योजनेशी जोडण्यात आलं आहे, असं मोदी यावेळी बोलताना म्हणाले.
इशान्येकडील राज्यांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम वेगाने सुरु आहे. याचाच परिणाम म्हणून सिक्कीम असो, मेघालय, मणिपूर, नागालँड, आसाम, अरुणाचल प्रदेश किंवा त्रिपुरा असो, सर्व राज्यांमध्ये अनेक कामं पहिल्यांदाच होत आहेत, असंही मोदींनी सांगितलं.
या राज्यांमध्ये पहिल्यांदाच विमानतळ झालं, पहिल्यांदाच रेल्वे आली, वीज पहिल्यांदाच पोहोचली, चौपदरी राष्ट्रीय महामार्ग पहिल्यांदाच बांधले, गावांमध्ये रस्ते तयार झाले, नद्यांवर पूल बांधले. डिजिटल इंडियाचा विस्तार होत आहे, असं मोदी म्हणाले.
आज आपल्या देशात 100 विमानतळ उभारुन पूर्ण झाले आहेत. यापैकी 35 विमानतळ गेल्या चार वर्षात सुरु झाले. स्वातंत्र्यानंतर देशात 2014 पर्यंत म्हणजे 67 वर्षात केवळ 65 विमानतळ होते. म्हणजे साधारणपणे एका वर्षात एक विमानतळ बांधलं गेलं. गेल्या चार वर्षात सरासरी एका वर्षात नऊ विमानतळ सुरु करण्यात आले, असं म्हणत मोदींनी जुन्या सरकारवर निशाणा साधला.