पणजी : मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच कायम राहतील असा निर्णय काल भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर केल्यानंतर, आज मंत्रिमंडळामधील दोन आजारी मंत्र्यांच्या जागी दोन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.


पर्रिकर यांच्या मंत्रिमंडळात आज दोन नव्या कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश होणार आहे. कुडचडेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल आणि मुरगावचे आमदार तथा अनिवासी भारतीय आयुक्त या कॅबिनेट दर्जाच्या पदावर असलेल्या मिलिंद नाईक यांचा आज संध्याकाळी राजभवनावर छोटे खानी सभारंभात शपथविधी सोहळा होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले वीजमंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगरविकस मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना मंत्रिमंडळामधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मडकईकर हे सध्या मुंबई इथे तर डिसोझा अमेरिकेत जेथे पर्रिकर यांनी उपचार घेतले होते त्याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
आजारी मंत्रिमंडळावरुन विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार आजारी पडले असून प्रशासन ठप्प झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यामुळे भाजपला सरकार चालवणं शक्य होत नसेल तर सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी राज्यपालांकडे काँग्रेसने अनेकदा करत सरकारवरील दबाव वाढवला होता. आता मंत्रिमंडळ फेररचना आणि खातेवाटप केव्हा होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

पर्रिकर मुख्यमंत्रीपदी असले तरी हॉस्पिटलमधून उपचार घेऊन येईपर्यंत मंत्रिमंडळामधील सर्वात ज्येष्ठ अर्थात सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या मगोच्या सुदिन ढवळीकर यांच्याकडे दरम्यानच्या काळात मुख्यमंत्रीपदाची सूत्रं सोपवून सरकारच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी रेटून धरली आहे. तर कायमस्वरुपी तोडगा काढा, अशी मागणी करणाऱ्या गोवा फॉरवर्डने मात्र ताप्तुरत्या तोडग्यावर समाधान व्यक्त केलं आहे.