Coronavirus Cases Today in India : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असताना मात्र भारतासाठी दिलासादायक बाब आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. देशात सोमवारी 100 हून कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मार्च 2020 नंतर सोमवारी सर्वात कमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना संसर्ग घटताना दिसत आहे. 29 जानेवारी 2020 रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता, त्यानंतर मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती.


भारतात 128 नवीन कोरोना रुग्ण


देशात गेल्या 24 तासांत 128 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर, सध्या देशात 1,998 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. आतापर्यंत चार कोटीहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच एकूण 5,30,728 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही नवीन आकडेवारी जारी केली आहे.


मार्चनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद


देशात सोमवारी 16 जानेवारी रोजी 83 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यापूर्वी 15 जानेवारी रोजी कोरोनाचे 114 रुग्ण आढळले होते. भारतात 27 मार्च 2020 रोजी पहिल्यांदा 24 तासांत 100 हून अधिक कोरोना सापडले होते आणि तेव्हापासून कोरोनाचा आलेख सतत वाढता होता. मात्र तब्बल दोन वर्षानंतर 16 जानेवारीला हा आलेख 100 च्या खाली पोहोचला होता, ही भारतीयांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे.


आठवड्याभरातील कोरोना रुग्ण घटले


चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. याशिवाय अमेरिका, जपान, दक्षिण कोरियामध्येही कोरोना संसर्गाची लाट पाहायला मिळत आहे. याउलट भारतात रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. जगातील कोरोनाचा कहर पाहता भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, असा इशारा देण्यात आला होता. खबरदारीच्या उपायांमुळे आठवड्याभरातील कोरोना रुग्ण घटले होते. 9 ते 15 जानेवारी या संपूर्ण आठवड्यात देशात फक्त 1,062 रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी 23 ते 29 मार्च 2020 या आठवड्यामध्ये सर्वात कमी साप्ताहिक रुग्णांची नोंद झाली होती.


कोरोना रुग्णांच्या मृत्यूही घटले


देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात देशात फक्त चार कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानंतर, गेल्या सोमवारपर्यंत सलग चार दिवस देशात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Coronavirus : देशात मार्च 2020 नंतर सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद, XBB.1.5 आणि BF.7 चे रुग्ण वाढले; सध्याची परिस्थिती वाचा सविस्तर