मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा ( J P Nadda)  यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आलाय. जून 2024 पर्यंत नड्डाच भापजचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील अशी माहिती गृहमंत्री अमित शाह यांनी दिलीय. त्यामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुका जे. पी. नड्डा यांच्याच अध्यक्षतेखाली लढवल्या जातील असे देखील अमित शाह यांनी सांगितले. 


नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर नड्डांचं काय होणार याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. हिमाचल हे नड्डांचं गृहराज्य आहे. तिथेच पराभूत झाल्यानं नड्डांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या प्रतिमेवर काही परिणाम होतो का याचीही चर्चा होती. परंतु, आज दिल्लीत झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डांनाच पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.  


नड्डांच्या कार्यकाळात बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश, मणीपूर, आसाम, गोवा आणि गुजरातमध्ये भाजपने निवडणुका जिंकल्या. गोवा आणि गुजरातमध्ये नड्डांच्या अध्यक्षतेखाली लढलेल्या निवडणुकीत आम्ही एकहाती सत्ता स्थापन केली. सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात नड्डा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वात बुथ सशक्तीकरण मोहीम राबवून ती यशस्वी करण्यात आली. कोरोना काळात देखील नड्डांच्या मार्गदशनाखाली मोठं काम करण्यात आलं, असं अमित शाह यांनी यावेळी सांगितलं.  


दिल्लीत सध्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं अधिवेशन सुरू आहे. त्यात नड्डांना ही मुदतवाढ दिली जाणार अशी जोरदार चर्चा होती. ही चर्चा अखेर खरी ठरली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत नड्डा यांना या पदावर मुदतवाढ मिळली आहे.  


नड्डा यांना मुदतवाढ मिळेलच अशी शक्यता आधीच वर्तवण्यात येत होती. परंतु, हिमाचल प्रदेश या त्यांच्या स्वत:च्या राज्यात भाजपचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि भाजपची तेथील सत्ता कॉंग्रेसच्या हाती गेली.  या पराभवामुळं नड्डा यांच्या प्रतिमेला धक्का लागल्यानं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना कायम ठेवलं जाईल का याची कुजबूज सुरु होती. परंतु, पुन्हा एकदा त्यांची मुदत वाढवण्यात आलीय. 


आगामी लोकसभा निवडणुका एका वर्षावर आल्या आहेत. त्याआधी याच वर्षात 9 राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होत आहेत. आता या सर्व निवडणुका जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली लढवल्या जाणार आहेत. 


महत्वच्या बातम्या


Mumbai Crime : दिल्लीतील चोरांचा मुंबईतील बंद घरांवर डोळा! चोरीसाठी विमानाने यायचे, मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या