PM Modi Takes Jibe At Opposition : सरकार स्थापन करण्यासाठी इतकी मेहनत घ्यावी लागत नाही जितकी, देश घडवण्यासाठी लागते, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांनी देशातील विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. राष्ट्र उभारणीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच आम्ही वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांवर काम करत आहोत, असेही मोदी म्हणाले. आज जल जीवन मिशन अंतर्गत हरघर जल उत्सवाला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले की,  भारताने अमृतकालमध्ये ज्या मोठ्या उद्देशांवर  काम सुरु केले त्या संबंधित तीन महत्त्वाचे टप्पे आज पूर्ण झाले. कोणते आहे तीन टप्पे -


पहिला टप्पा - 
आज देशातील 10 कोटी ग्रामीण कुटुंबे जलवाहिनीद्वारे शुद्ध पाण्याच्या सुविधेशी जोडली गेली आहेत. प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याच्या सरकारच्या मोहिमेचे हे मोठे यश आहे. हे ‘सबका प्रयास’चे उत्तम उदाहरण आहे असे ते म्हणाले.  


दुसरा टप्पा - 
पहिले हरघर जल प्रमाणित राज्य बनल्याबद्दल त्यांनी गोव्याचे अभिनंदन केले. इथे प्रत्येक घर जलवाहिनीद्वारे पाण्याने जोडले गेले आहे. दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या हे यश मिळवणाऱ्या पहिल्या केंद्रशासित प्रदेशांचेही त्यांनी कौतुक केले. जनता, सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. लवकरच अनेक राज्ये या यादीत सामील होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


तिसरा टप्पा - 
 देशातील विविध राज्यांमधील एक लाख गावे ओडीएफ प्लस झाली आहेत. काही वर्षांपूर्वी देशाला हागणदारीमुक्त (ओडीएफ) घोषित केल्यानंतर, पुढील संकल्प हा खेड्यांसाठी ओडीएफ प्लस दर्जा मिळवण्याचा होता, त्यानुसार त्यांना सामुदायिक शौचालये, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, वापरलेल्या पाण्याचे व्यवस्थापन आणि गोबरधन प्रकल्प राबवायचे होते असे पंतप्रधानांनी सांगितले.


जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने बहुआयामी दृष्टिकोन ठेवला आहे, याविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले,पावसाचा थेंब न थेंब साठवण्यात यावा, ‘अटल भूजल योजना’ , प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 अमृत सरोवरे तयार करणे, नदी जोड प्रकल्प आणि जल जीवन मिशन यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितलं. 




पंतप्रधानांनी यावेळी भावी पिढी आणि महिलांसाठी ‘हर घर जल’ मोहिम महत्वाची असल्याचे अधोरेखित केले. पाण्यासंबंधित सर्व समस्यांचा त्रास प्रामुख्याने घरातल्या महिला वर्गाला होतो. त्यांचा त्रास कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विकास कामांच्या  केंद्रस्थानी  महिला असल्यामुळे महिलांच्या राहणीमानामध्ये सुधारणा करण्याचे काम सरकार करीत आहे. गावाच्या जल प्रशासनाच्या कामातही महिलांना महत्वाची भूमिका दिली जात आहे. ‘‘जल जीवन अभिमान’’ काही फक्त सरकारी योजना नाही. तर ती समाजाने, समाजासाठी चालवलेली योजना आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.