मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर 'मन की बात' या कार्यक्रमातून कॅशलेस सोसायटी निर्माण करण्याचा संकल्प बोलून दाखवला. तरी ग्रामीण भागातून पारंपरिक देवाण-घेवाणीची वस्तूविनिमय पद्धत अर्थात बार्टर (Barter System) पद्धतीचा अवलंब अनेक ठिकाणी होत आहे.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागाला चांगलाच फटका बसला आहे. नोटाबंदीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील एका छोट्याशा गावातील ग्रामस्थांनी, आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पारंपरिक वस्तूंविनिमयाचा (Barter System) मार्ग अवलंबला आहे. याबाबतचे वृत्त बीबीसीने प्रकाशित केले आहे.
पश्चिम बंगालमधील बृंदावनपूरमधील ग्रामस्थांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी एक किलो तांदळाच्या बदल्यात बटाटा, साखर, मीठ अशा दैनंदिन गरजा भागवण्यासाठी उपयोगी वस्तूंची देवाण-घेवाण करण्यास सुरुवात केली आहे.
या गावातील ग्रामस्थ बिपक तारिणी सांगते की, ''नोटाबंदीचे संकट यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. पैशांच्या बदल्यात आम्हाला दुकानदार दोन किलो तांदूळ देतात. यातील एक किलो आम्ही दैनंदिन वापरासाठी ठेवतो, तर उर्वरित एक किलो तांदळाचा वापर इतर वस्तू घेण्यासाठी करतो.''
नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक ठिकाणी शेतमजुरांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी देखील शेतमजुरांना त्यांना त्यांचा कामाचा मोबदला म्हणून त्या प्रमाणात धान्य देत आहेत.
वस्तूंच्या या देवाण-घेवाणीच्या पद्धतीने ग्रामस्थांना तात्पूर्ता दिलासा मिळाला असला, तरी या गावात लवकरच पैसे पोहोचले नाहीत, तर परिस्थिती आणखीच बिकट होऊ शकते.
दरम्यान, अशाच प्रकारे वस्तूंच्या देवाण-घेवाणीची पद्धत महराष्ट्रातही सुरु आहे. वर्ध्याच्या सेलू तालुक्यात ज्वारीचं फार कमी उत्पादन होतं, मात्र इथं ज्वारीला मोठी मागणी आहे. हेच ओळखून प्रफुल्ल जिरापुरे या तरुणाने ही देवाण-घेवाणीचा नवा व्यवसाय सुरु केला.
मध्य-प्रदेशातून 15 रुपये किलोनं ज्वारी विकत घ्यायची. विदर्भातील गावागावात फिरून गव्हाच्या बदल्यात ती द्यायची. गहू बाजारात 20 रुपये किलोनं विकायचा. आणि किलोमागं 5 रुपये नफा कमवायचा. बेरोजगारीवर तरुणांनी असा उपाय शोधलाय. हंगामात 500 क्विंटल ज्वारीची देऊन एवढाच गहू ते घेतात. बाजारात गव्हाची विक्री करुन अडीच ते तीन लाखांचा नफा ते कमावतात.