तिरुपती: दाक्षिणात्य अभिनेते आणि तेलगू देसम पक्षाचे आमदार एन. बालकृष्ण यांची पत्नी वसुंधरा देवी यांच्याकडे जवळपास 10 लाख रुपयांची जुन्या नोटांची रोकड आढळून आली. तेलंगणामधील रेनीगुंटा विमानतळावरुन ही रोकड जप्त करण्यात आली.


हैदराबादहून रेणीगुंटाला आलेल्या विमानातून वसुंधरादेवी उतरल्यानंतर त्यांच्या सामानाची झडती घेतली असता त्यांच्याकडून ही रोकड आढळली. यावेळी वसुंधरा यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील इतर पाचजण प्रवास करत होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी आणि नंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याजवळील 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या असून त्यांची चौकशी सुरु केली.

यावेळी वसुंधरा यांनी अधिकाऱ्यांना आयकरचे विवरणपत्र दाखवून ही रोकड भगवान व्यंकटेश्वर मंदिरात घेऊन जात असल्याचे सांगितले. तसेच त्यांना ही रक्कम मंदिरातील हुंडीत दान करायची असल्याची माहितीही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मंदिरात जाण्यास परवानगी दिली.

दरम्यान, बालकृष्णन हे तेलंगणा राज्यातील सत्तारुढ तेलगू देसम पक्षाचे हिंदूपूर विधानसभा क्षेत्रातून आमदार आहेत. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एम. चंद्रबाबू नायडू व्याही आहेत. बालकृष्ण यांच्या मुलीचे लग्न चंद्रबाबू नायडू यांचा मुलगा लोकेश सोबत झाला आहे.