नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आज देशभरातील 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही खासदार या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना ईद आणि अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा दिल्या. 


 






बंगालच्या शेतकऱ्यांना पहिल्यांदाच या योजनेचा लाभ
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र  मोदी म्हणाले की, "कोरोना काळात देशातील शेतकऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आणि अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन घेतले. बंगालच्या लाखो शेतकऱ्यांना आज पहिल्यांदाच या योजनेचा लाभ मिळत असून आज त्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा होत आहे. ज्या प्रमाणे राज्याकडून शेतकऱ्यांच्या नावाची यादी केंद्र सरकारला पाठवली जाईल त्याप्रमाणे या संख्येत भर पडेल."


पंतप्रधानांना सांगितलं की, "कोरोना काळात भारतात जगातील सर्वात मोठी मोफत धान्यांची योजना सुरु करण्यात आली होती. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत गेल्या वर्षी 8 महिने गरीबांना मोफत धान्य वाटप करण्यात आलं होतं. या वर्षी मे आणि जूनमध्ये देशातील 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य देण्याचे नियोजन केलं आहे." 


पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत लाभार्थी शेतकरी परिवाराला प्रत्येक वर्षी 6000 रुपये दिले जातात. हे 6000 रुपये तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात. आतापर्यंत एकूण रक्कमेचा विचार करता 1.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना 8 हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. 


महत्वाच्या बातम्या :