अहमदाबाद : देश कोरोनाविरोधात लढाई लढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं आणि आपण पीएम केअरला दोन लाख 51 हजार रुपये मदत केली. पण स्वत: च्या आईला कोरोना झाला असताना मात्र तिला कुठेही बेड मिळाला नाही, शेवटी तिचा जीव गेला अशी खंत गुजरातमधील विजय पारिख या व्यक्तीने व्यक्त केली आहे. 


विजय पारिख यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली असून त्यांनी 2,51,000 रुपये पीएम केअरला दिल्याचे सर्टिफिकेटही शेअर केलं आहे. विजय पारिख आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करताना म्हणाले की, "अडीच लाखांची मदत केली तरी माझ्या मरणाऱ्या आईला बेड मिळाला नाही. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मी अजून किती रुपये दान केलं पाहिजे, ज्यामुळे माझ्या कुटुंबातील इतर व्यक्तींना बेड मिळेल, ज्यामुळे त्यांचा जीव जाणार नाही." 


 




विजय पारिख यांनी हे ट्वीट करताना त्यामध्ये पंतप्रधान कार्यालय, राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्मृती इराणी आणि राष्ट्रपती भवनला टॅग केलं आहे. 


आपल्यासारखे या देशात अनेक असल्याचं सांगत विजय पारिख यांनी सांगितलंय की, पैसा हा मुद्दाच नाही, जर पैशाने इतर रुग्णांना सुविधा मिळत असतील तर मी माझी सर्व संपत्ती दान करायला तयार आहे. 


देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी, बेड्सच्या अभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पीएम केअरला लाखो रुपये देऊनही अनेकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना वाचवाता आलं नाही. 


महत्वाच्या बातम्या :