नवी दिल्ली : कोरोनाचं संकट आजूबाजूला असताना दिल्ली पोलिसांच्या तत्परतेची वाटचाल भलत्याच दिशेनं सुरु आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना काळात मदत करणाऱ्या लोकांच्या चौकशीसाठी दिल्ली पोलीस पोहचले होते. काल ते पोहचले ट्विटर इंडियाच्या कार्यालयात चौकशीसाठी.


 काँग्रेस आणि भाजप या राजकीय पक्षांचं भांडण होतं. पण त्यात दिल्ली पोलिसांचा पहिला निशाणा  ट्विटर ठरलं. टूलकिट प्रकरणात चौकशीसाठी दिल्ली पोलिस थेट ट्विटर इंडियाच्या कार्यालयात दाखल झाले. दिल्ली पोलिसांच्या दोन स्पेशल टीम काल संध्याकाळी कार्यालयात पोहचल्या आणि हा ड्रामा सुरु झाला.  पण चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना कदाचित माहिती नसावं की ट्विटर गेल्या मार्चपासूनच वर्क फ्रॉम होम करतंय. त्यामुळे ऑफिसकडे कुणी फिरकतच नाही. आता ट्विटरचा टुलकिटशी, काँग्रेस-भाजपमधल्या भांडणाशी काय संबंध आहे.


कोरोनाकाळात पंतप्रधानांच्या बदनामीसाठी काँग्रेसनं ट्विटरवर टूलकिट तयार केल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला होता. कोरोनाच्या इंडिया व्हेरियंटला मोदी व्हेरियंट म्हणा, कुंभमेळा सुपर स्प्रेडर बनला हे सांगा अशा पद्धतीच्या सूचना त्यात दिल्याचा त्यांचा आरोप होता. पण जे पत्र संबित यांनी दाखवलं ते काँग्रेसच्या फेक लेटरहेडवर असल्याचं सांगत काँग्रेसनं आरोप फेटाळले. इतंकच नाही तर चुकीचे आरोप लावल्याबद्दल भाजप नेत्यांविरोधात एफआयआरही दाखल केली.  याच टुलकिट आरोपावरुन संबित पत्रांच्या ट्विटला मॅन्यिप्युलेटेड मीडिया असा शिक्का ट्विटरनं मारला. त्यामुळे भाजपची चांगलीच नाचक्की झाली. केवळ संबित पात्राच नव्हे तर इतर सात भाजप नेत्यांच्या ट्विटला हा शिक्का होता. 


 केंद्र सरकारनं त्यानंतर दोनच दिवसांत ट्विटरला ही कारवाई मागे घेण्यासाठी नोटीस पाठवलं.आयटी मंत्रालयानं म्हटलं की हा आरोप मॅन्यिप्युलेटेड आहे हे ठरवण्याचा अधिकार ट्विटरला कुणी दिला? तु्म्ही फक्त एक माध्यम आहात संदेश पोहचवण्याचं तुम्ही हा निकाल देऊ शकत नाही. आता या सगळ्या घटनाक्रम पाहिल्यानंतर तुम्हाला काल दिल्ली पोलिसांनी ट्विटरच्या ऑफिसमध्ये मारलेल्या धाडीचा अर्थ लक्षात येईल. काही दिवसांपूर्वी अशीच तत्परता दाखवत दिल्ली पोलीस कोरोना काळात मदत करणाऱ्या लोकांच्या चौकशीसाठी पोहचले होते.  


दिल्ली पोलिसांच्या या धडक मोहीमेवर राहुल गांधीनी ट्विटरवर अप्रत्यक्षपणे टीका करत सरकारला इशारा दिला. कालच्या धडक मोहिमेत दिल्ली पोलिसांच्या हाती मात्र काही लागल्याचं दिसत नाही. नोटीस द्यायची कुणाला हा पोलिसांसमोरचा पेच कायम आहे. शिवाय डिजीटल पद्धतीनं काम चालणाऱ्या कंपनीत ते नेमक्या कुठल्या फाईली शोधणार होते काय माहिती?.अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्या ट्विटला मॅनिप्युलेटेड मीडियाचा शिक्का मारण्याचं धाडस ट्विटरनं दाखवलं होतं. त्यांचं अकाऊंट बंद केलं होतं. त्यामुळे आता तिकडे एवढं धाडस दाखवणारं ट्विटर भारतातही आपला बाणा कायम ठेवतं की मोदी सरकारच्या दबावाला झुकतं हे पाहावं लागेल