कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जयदीप घनखड यांच्यातील वादामुळे त्या ठिकाणचं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. त्यातच आता एका अॅडव्होकेटने राज्यपालांच्या विरोधात एक याचिका दाखल केली आहे. बंगालचे राज्यपाल हे भाजपचे प्रतिनिधी म्हणून काम करतात, त्यामुळे त्यांना हटवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने केंद्राला द्यावेत अशा आशयाची ती याचिका आहे. या याचिकेवर 11 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. 


ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, अॅडव्होकेट राम प्रसाद सरकार यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जयदीप धनखड यांना राज्यपाल पदावरुन हटवावे यासाठी कोलकाता उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. राज्यपाल हे राज्य सरकारच्या कामांमध्ये हस्तक्षेप करत असून त्यामुळे घटनेतील तरतूदींचे उल्लंघन केलं जात असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. राज्यपाल हे केंद्रातील भाजप सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करत असून ते राज्य सरकारची अडवणूक करत असल्याचा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. 


काय म्हटलंय या याचिकेत? 
भारतीय घटनेने राज्यपालांसाठी एक लक्ष्मण रेषा आखून दिली आहे. त्यानुसार त्यांना काम करावं लागतं. पण पश्चिम बंगालचे राज्यपाल जयदीप धनखड यांनी मात्र राज्यपाल पदाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. जर न्यायालयाने आवश्यक पाऊले उचलली नाहीत तर देशातील लोकशाहीला धोका असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. 


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जयदीप धनखड यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून मोठा तणाव निर्माण झाला आहे. राज्यपाल हे केद्रांच्या इशाऱ्यावर काम करत असून राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. 


बंगालच्या मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या वादाला केंद्र आणि राज्य सरकारच्या वादाची किनार आहे. महात्मा गांधी पुण्यतिथीच्या दिवशी राज्यपाल जयदीप धनखड यांनी बंगाल सरकावर सडकून टीका केली होती. 'मी बंगालच्या पवित्र भूमीला हिंसेमुळे रक्ताने माखलेलं पाहू शकत नाही. मानवाधिकारांना चिरडण्यासाठी बंगाल एक प्रयोगशाळा बनत आहे. हे राज्य लोकशाहीसाठी गॅस चेंबर होत आहे' असं त्यांनी म्हटलं होतं. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha