मुंबई : फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मुंबई प्रेस क्लबच्या वतीनं देण्यात येणारा प्रतिष्ठेचा मरणोपरांत रेडइंक 'जर्नलिस्ट ऑफ द इयर' (Journalist of The Year Award) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या हस्ते या वर्षीचा रेडइंक 'जर्नलिस्ट ऑफ द इयर' दानिश सिद्दीकी यांच्या पत्नी फेड्रिक सिद्दीकी यांनी स्वीकारला. रॉयटर्ससाठी अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करायला गेलेले भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची तालिबान या दहशतवादी गटाकडून हत्या करण्यात आली होती. 


हा पुरस्कार प्रदान करताना सरन्यायाधीश एन व्ही रमणा म्हणाले की, "दानिश सिद्दीकी एक जादुई डोळ्याचं व्यक्तीमत्व होतं. सध्याच्या काळातील त्यांना एक अग्रणीचे पत्रकार मानले जायचं. जर एखादी घटना एक हजार शब्दात सांगता येत असेल तर त्यासाठी दानिश सिद्दीकी यांचा एक फोटो पुरेसा असायचा."


अफगाणिस्तानमध्ये रॉयटर्स या वृत्तवाहिनीसाठी रिपोर्टिंग करणाऱ्या भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची 16 जुलैला तालिबान या दहशतवादी गटाकडून हत्या करण्यात आली होती. दानिश सिद्दीकी अफगाणिस्थानमधील परिस्थिती कव्हर करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. अफगाणिस्थानातील स्थानिक वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, दानिश सिद्दीकी यांची हत्या कांधार प्रांतातील स्पिन बोल्डक परिसरात करण्यात आली होती. 


मूळच्या दिल्लीच्या असणाऱ्या दानिश सिद्दिकी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक टीव्ही रिपोर्टर म्हणून केली होती. त्यानंतर ते फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करु लागले. दानिश सिद्दीकी यांना 2018 मध्ये त्यांचे सहकारी अदनान आबिदी यांच्यासह पुलित्जर पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यावेळी ते पुलित्जर पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय होते. दानिश यांनी रोहिंग्या शरणार्थी प्रकरणही कव्हर केलं होतं. 


महत्त्वाच्या बातम्या :