नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या अभूतपूर्व रोकड टंचाईच्या काळात पेट्रोल पंपावरून 209 कोटी रूपये सर्वसामान्य नागरिकांना वितरित करण्यात आले.

नोटाबंदीनंतर एटीएम आणि बँकांच्या बाहेर नागरिकांनी भल्यामोठ्या रांगा लावल्या होत्या. त्यामुळे अनेकांना दैनंदिन व्यवहारासाठीही पैसे मिळवण्यात अडचणी येत होत्या. यामुळे पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने देशभरातील पेट्रोल पंपावर मायक्रो एटीएमच्या सहाय्याने तब्बल 209 कोटी रूपये वितरीत झाले. डेबिट कार्ड स्वाईप करून अडीच हजार रूपये मिळण्याची सुविधा देशभरातल्या 2600 पेट्रोलपंपांवर उपलब्ध करून देण्यात आली होती.

आता एटीएमबाहेरच्या रांगा बऱ्यापैकी कमी झाल्या आहेत. तसंच एटीएम आणि बँकातूनही पैसे मिळू लागले आहेत. रिझर्व बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार, नोटबंदीनंतर झालेली रोकड टंचाई दूर करण्यासाठी तब्बल 9.2 लाख कोटी रूपये बँकिंग सिस्टीममध्ये टाकण्यात आले आहेत. नोटाबंदीनंतर रद्द झालेल्या 15.4 लाख कोटी रूपयांच्या तुलनेत ही रक्कम साठ टक्क्यांच्या जवळपास आहे.

15.4 लाख कोटींच्या तुलनेत 209 कोटी ही रक्कम तशी किरकोळ असली तरी अनेकांची एटीएमबाहेरच्या रांगामधून काही प्रमाणात का होईना पण सुटका झाली.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने डिजीटल व्यवहाराला चालना देण्यासाठी या काळात डेबिट-क्रेडिट कार्डवर इंधन भरणाऱ्यांना 0.75 टक्क्यांचा सरचार्जही माफ करण्यात आला. सध्या देशभरातील  53,522 पेट्रोलपंपापैकी 49,644 पंपावर ई-वॉलेट द्वारे पैसे देण्याची सुविधा आहे तर 33,169 पेट्रोलपंपांवर पीओएस म्हणजे कार्ड स्वाईप मशिन्स आहेत. म्हणजेच जवळपास 70 टक्के पेट्रोलपंपावर कॅशलेस व्यवहार होऊ शकतात, असं पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय.