नवी दिल्ली : 8 नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी आणखी एक मुदत मिळण्याची शक्यता आहे. 'हिंदुस्थान टाइम्स' या वृत्तपत्रात रिझर्व बँकेच्या सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. मात्र रद्द करण्यात आलेल्या नोटा स्वीकारण्यासाठी ही अत्यंत मर्यादित मुदत असेल तसंच त्यादरम्यान स्वीकारली जाणारी रक्कमही अत्यल्प असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या 50 दिवसात जुन्या, रद्द करण्यात आलेल्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत होती. या काळात अनेकांनी रांगा लावून बँकांमध्ये जुन्या नोटा जमा केल्या. त्यानंतरही ज्यांच्याकडे जुन्या नोटा शिल्लक आहेत, त्यांना रिझर्व बँकेत योग्य आणि समर्पक कारण देऊन जुन्या नोटा जमा करण्याची मुभा आहे. 1 जानेवारीपासून 31 मार्चपर्यंतची मुदत ही प्रामुख्याने एनआरआय किंवा नोटाबदलीच्या 50 दिवसांत देशाबाहेर असलेल्या नागरिकांसाठी आहे.
नोटा बदलण्याची किंवा जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची मुदत संपल्यानंतरही अनेकांकडे काही प्रमाणात जुन्या नोटा शिल्लक आहेत. त्यापैकी अनेकांनी रिझर्व बँकेला पत्र आणि मेलद्वारे त्यांची गाऱ्हाणी मांडलीत. काही जणांना अचानक जुन्या पोथ्या किंवा पुस्तकात ठेवलेली हजार किंवा पाचशेची नोट आढळून आली, तर काहींना कुठल्याशा डब्यात किंवा अन्यत्र दडवून ठेवलेले पैसे सापडले. त्यामुळे हे पैसे नियमित उत्पन्नातले असूनही सध्या बँकेत भरता येत नाहीत, म्हणून आणखी एक अल्पमुदतीची संधी देण्याची मागणी करण्यात येत होती.
त्यावरच रिझर्व बँकेकडून सकारात्मक प्रतिसाद येण्याची शक्यता आहे. मात्र या वेळी जुन्या नोटांमधील फक्त दोन हजार रुपयेच एका व्यक्तीला बँकेत भरण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अजून काहीही निश्चित असं धोरण स्पष्ट झालेलं नाही. जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी मिळणार असलेल्या या संधीचा गैरवापर होऊ नये म्हणून अत्यल्प प्रमाणात जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.