Hardeep Puri On Petrol Prices: पेट्रोल डिझेलच्या (Petrol-Diesel Price Today) दरांवरून सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की, देशातील पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. यांचसंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी संसदेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. सध्याची जागतिक परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या (Crude Oil) आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती लक्षात घेता, पेट्रोलच्या किमती इतर देशांच्या तुलनेत देशात सर्वात कमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 2021 ते 2022 दरम्यान, आंतरराष्ट्रीय किमतीत झपाट्यानं वाढ झाली असतानाही भारतात पेट्रोलचे दर केवळ दोन टक्क्यांनी वाढले आहेत.


गुरुवारी संसदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, "केंद्रानं उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काही राज्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती कमी करण्यासाठी व्हॅट कमी केला होता, तर काही भाजप विरोधी राज्यांनी केला नाही. पुढे बोलताना पुरी म्हणाले की, "मी सांगू इच्छितो की, अद्याप पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि झारखंडनं त्यांच्या दरात कपात केलेली नाही."


"केंद्र सरकारनं दोनदा व्हॅट कमी केला' 


पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, "पेट्रोल पंपावरील किंमत वाजवी पातळीवर ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली आहे. पुरी पुढे बोलताना म्हणाले की, "मला तुम्हाला सांगण्यात आनंद होतोय की, काही राज्यांनीही व्हॅट कमी केला आहे. आता आमची अशी परिस्थिती आहे की, काही राज्यं 17 रुपये दरानं व्हॅट आकारत आहेत आणि इतर भाजप विरोधी राज्य 32 रुपये दरानं व्हॅट आकारत आहेत."


"वैश्विक स्तरावर अनिश्चितता"


केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले की, "यामध्ये एक अंतर आहे. काही सभासद म्हणत होते की, आज काही ठिकाणी पेट्रोलची किंमत 100 रुपये लिटर आहे, अशा परिस्थिती मला सांगायचंय की, आजचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, आपण वैश्विक स्तरावर अनिश्चततेचा सामना करतोय." 


"आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोलच्या दरांत वाढ"


हरदीप सिंह पुरी म्हणाले की, "पेट्रोलच्या किमती आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या फरकानं वाढल्या आहेत. किमती कधी कधी 40 टक्क्यांनी जास्त किंवा 50 टक्क्यांनी जास्त असतात. भारतात पेट्रोलच्या किमती 2021 ते 2022 या काळात फक्त दोन टक्क्यांनी वाढल्या आहेत, त्याचं कारण आमच्याकडे आहे. आमचं उत्पादन शुल्क कमी केलं आणि आम्ही राज्यांनाही व्हॅट कमी करण्याचं आवाहन केलं आहे. काही राज्यांनी केलं, काही राज्यांनी केलेलं नाही."


तेल कंपन्यांच्या महसुलाचा संदर्भ देत हरदीप सिंह पुरी म्हणाले की, "माझ्याकडे काही आकडे आहेत, जे बरेच काही सांगत आहेत. OMCs नं आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत 28,360 कोटी रुपयांचा करपूर्व नफा (Profit Before Tax) कमावलाय. हा  27,276 कोटींचा करपूर्व लाभ आहे. IOCL, BPCL आणि HPCL या तिनही कंपन्यांनी पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 27,276 कोटींचा एकत्रित तोटा नोंदवला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या उत्पादन शुल्कातील कपातीचं हे मिश्रण आहे."


ते म्हणाले की, आज पेट्रोलचे दर कदाचित भारतात सर्वात कमी आहेत. भारतातील कच्च्या तेलाच्या दरांत सरासरी 102 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2020 आणि नोव्हेंबर 2022 दरम्यान ते 43.34 डॉलरवरून 87.55 डॉलरपर्यंत वाढलं आहे. त्यावेळी 102 टक्के असताना पेट्रोलच्या किरकोळ किंमतीत केवळ 18.95 टक्के वाढ झाली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Petrol Diesel Price: क्रूड ऑईलच्या किमतीत आज 1.5 डॉलरची घट; देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त की महाग?