CNG Price Hike Today : भारतीय बाजारात वाहनांच्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल-डिझेलपासून (Petrol-Diesel) ते सीएनजीपर्यंतचे दर झपाट्यानं वाढत आहेत. देशात पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, त्याचप्रमाणे सीएनजीवरही महागाईनं आक्रमण केलं आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.
अवघ्या पाच दिवसांपूर्वी राज्य सरकारनं व्हॅटच्या दरात कपात करत सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना दिलासा दिला होता. मात्र हा दिलासा अल्पायुषी ठरला. कारण या निर्णयानंतर सहाव्या दिवशी पुन्हा एकदा सीएनजी, पीएनजी दरवाढीची कुऱ्हाड ग्राहकांवर कोसळली आहे. मुंबईत सीएनजीच्या किमतीत 7 रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एक एप्रिलला राज्य सरकारनं नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये कपात केली होती. मात्र आज झालेल्या दरवाढीनं सीएनजी, पीएनजीचे दर पुन्हा एकदा मूळ किमतीवर पोहोचले आहेत. त्यामुळे राज्य सरकारनं केलेल्या व्हॅट कपातीचा ग्राहकांना फायदा झालाच नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
महानगर गॅस लिमिटेडनं (MGL) ग्राहकांना सीएनजी आणि पीएनजीच्या (CNG, PNG Price) दरांमध्ये वाढ केली आहे. एमजीएलनं सीएनजीच्या दरात 7 रुपये प्रतीकिलो तर पीएनजीमध्ये 5 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे. या दरवाढीमुळे मुंबई आणि परिसरात सीएनजीची किंमत 67 रुपये प्रतीकिलो तर पीएनजीची किंमत 41 रुपये प्रती एससीएम अशी होणार आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सीएनजी गॅसच्या दरात 2.50 रुपयांनी वाढ केल्यानंतर आता सीएनजीचे दर 66.61 रुपये प्रति किलो झाली आहे. गेल्या 5 दिवसांत सीएनजी 6.60 रुपये किलोनं महागला आहे. तर 16 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. वाहनांच्या इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं जनता हैराण झाली आहे.
भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करांनुसार, त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. क्रिसिल रिसर्चनुसार, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीवर पूर्णपणे मात करण्यासाठी प्रति लिटर 9-12 रुपयांची वाढ आवश्यक आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले
देशात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. चार महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर 22 मार्च रोजी पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर केवळ 16 दिवसांमध्येच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. आजची दरवाढ ही सोळा दिवसांत झालेली चौदावी वाढ आहे. 22 मार्च पासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेल तब्बल 10 रुपयांनी महागलं आहे. तसेच आज सीएनजीच्या दरांतही अडीच रुपयांची वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले, आज पुन्हा वाढ, 16 दिवसांतील चौदावी दरवाढ, एक लिटरचे दर काय?