Petrol Diesel Price Today 28 September 2022 : चार महिन्यांहून अधिक काळ देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र कच्च्या तेलानं विक्रमी पातळी गाठली आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सातत्यानं घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सुरु असलेली घसरण अजूनही सुरूच आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागलेल्या तेलातून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांची कपात होण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

कच्चं तेल 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरल्या आहेत. मंगळवारी संध्याकाळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 86.17 डॉलर आणि WTI क्रूड प्रति बॅरल 78.53 डॉलरवर बंद झालं. तेलाच्या किमती घसरल्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मेघालय सरकारनं काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रतिलिटर दीड रुपयांची वाढ केली होती. यापूर्वी महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात आला होता.

यापूर्वी 22 मे रोजी केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेव्हा पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलचे दर (Diesel Price) घटले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना दरात दिलासा मिळाला होता. किमतीतील हा बदल चार-तीन महिन्यांपूर्वी झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र आणि मेघालयमध्ये तेलाच्या दरांत बदल झाला आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर व्हॅटमध्ये कपात केल्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झालं होतं. 

महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल 'या' जिल्ह्यात 

महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल परभणी जिल्ह्यात विकलं जात आहे. परभणीत सध्याचा पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे. तर, राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.04 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 92.59 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे. 

देशातील महानगरांतील दर काय? 

शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 106.31 रुपये 94.27 रुपये
दिल्ली 96.72 रुपये 89.62 रुपये
चेन्नई 102.74 रुपये 94.33 रुपये
कोलकाता 106.03 रुपये 92.76 रुपये