मुंबई : देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलचे दर शंभरी पार करणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरलं आहे. विशेष म्हणजे जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात पेट्रोलचे दर हे मुंबईच्या तुलनेत अर्धे आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मुंबईतील पेट्रोलचा आजचा दर हा 100.47 रुपये इतका आहे. डॉलरची तुलना केल्यास हा दर 1.39 डॉलर इतका आहे. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर हा 0.79 डॉलर इतका आहे अशी माहिती ब्लुमबर्गने न्यूयॉर्क स्टेट एनर्जी रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटीच्या हवाल्यानं दिली आहे.
कच्च्या तेलाच्या आयातीचा विचार करता भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक मोठा आयातय देश आहे. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीला बसला असून त्याच्या विक्रीत 9.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या सात वर्षापासून, 2014 पासून केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारने इंधनावरच्या करात सातत्यानं वाढ केली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना इतर देशांच्या तुलनेत जास्त दराने पेट्रोलची खरेदी करावी लागते.
भारतात केंद्राची 33 तर राज्याचा 32 रुपये कर
सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत.
देशात 15 जून 2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात.
महत्वाच्या बातम्या :
- GDP : भारतीय अर्थव्यवस्थेनं गेल्या 40 वर्षांचा विक्रम मोडला, जीडीपीमध्ये 7.3 टक्क्यांची घसरण
- Pawar-Fadnavis Meet : भेटीचा राजकीय अर्थ काढणं चुकीचं, पवारांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं असावं : संजय राऊत
- Covid19 : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना आपल्या मुलांना 'फ्लू'ची लस देणं का महत्वाचं आहे?