मुंबई : गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आधीच महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना सातत्याने पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींना तोंड द्यावं लागत आहे. पण रविवारी या दरात कोणतीही वाढ न झाल्याने काही अंशी का असेना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.58 रुपये तर डिझेलची किंमत 88.60 रुपये इतकी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी या दरात कोणतीही वाढ न झाल्याचं दिसून येतंय.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने त्यांचे दर कमी करण्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव आहे. त्यांच्या वाढलेल्या किंमतीपासून दिलासा मिळावा, यासाठी त्यांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी होत आहे. तत्कालीन मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनीही पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा सल्ला दिला होता. या अगोदर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही याबाबत सूचना केली आहे. एसबीआयचे अर्थशास्त्रज्ञ सौमिकांत घोष यांनीही पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यानंतर पेट्रोलची किंमत 75 आणि डिझेलची किंमत 68 रुपयांवर येऊ शकते.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करावा असा सल्ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की होते की, "इंधनाच्या वाढत्या किंमती या ग्राहकांवर परिणाम करतातच, त्याचसोबत सर्वच क्षेत्रावर त्यांचा परिणाम होतो. केवळ बाईक वा कार मालकांच्यावर याचा परिणाम होत नसून त्याचा परिणाम उत्पादन क्षेत्र, वाहतूक आणि इतरही क्षेत्रावर पडतोय."
गेल्या काही दिवसात आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. त्याचा परिणाम आपल्या देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढण्यावर होत आहे. काही शहरात पेट्रोलच्या किंमती या शंभरी पार करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे लोकांना महागाईला सामोरं जावं लागतंय. वाढत्या पेट्रोलच्या किंमतीमुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. त्यातच आता तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, पद्दुचेरी आणि आसाम या पाच राज्यांच्या निवडणूका आहेत.
सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर तीन सोप्या पद्धतीने पाहता येतील. तुम्ही तुमच्या जिल्हाचं, तालुक्याचं लोकेशन सिलेक्ट करुन किंवा पेट्रोल पंपाचं नाव https://associates.indianoil.co.in/PumpLocator/ या लिंकवर टाकून इंधनाचे दर काय आहेत याची माहिती घेऊ शकता. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकते. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.