कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. यावेळी निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांवर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे छायाचित्र असलेल्या सरकारी योजनांच्या जाहिराती काढण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाने सरकारी योजनांशी संबंधित या जाहिरातींना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन मानले आहे.


निवडणूक आयोगाने बुधवारी सायंकाळी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, पेट्रोल-पंपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासह केलेल्या जाहिराती आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. म्हणूनच त्यांना 72 तासांच्या आत काढून टाकण्यात याव्यात. टीएमसीच्या एका शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी टीएमसीनेही कोरोना लस घेतल्याबद्दलच्या प्रमाणपत्रात पंतप्रधान मोदींच्या फोटोबाबतही आक्षेप घेतला आहे.


टीएमसीच्या शिष्टमंडळाने कोरोना लस प्रमाणपत्र आणि पेट्रोल पंपवरील जाहिरातींमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोंना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटलं होतं. त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. शिष्टमंडळात आलेल्या ममता सरकारचे मंत्री फरहाद हकीम यांनी याला 'सरकारी यंत्रणेचा गैरवापर' असे संबोधले आणि निवडणूक आयोगाला या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली.


टीएमसीने निवडणूक आयोगाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी या विधानसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक आहेत. एक राजकारणी म्हणून, मेळाव्यात ते आपल्या पक्षाला पाठिंबा देण्याची मागणी करणार आहेत. या परिस्थितीत पेट्रोल पंप आणि लसीकरणाच्या प्रमाणपत्रात त्याच्या फोटोचा वापर मतदारांवर परिणाम करणे आणि आचारसंहितेचे उल्लंघन करण्यासारखे आहे. 26 फेब्रुवारी रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्याबरोबरच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.


Election 2021 Dates, Full Schedule: बंगाल, केरळसह 5 राज्यात निवडणुका जाहीर; पश्चिम बंगालमध्ये तब्बल 8 टप्प्यात होणार मतदान


पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक




  • पहिला टप्पा - 27 मार्च मतदान

  • दुसरा टप्पा - 1 एप्रिल मतदान

  • तिसरा टप्पा - 6 एप्रिल मतदान

  • चौथा टप्पा - 10 एप्रिल मतदान

  • पाचवा टप्पा - 17 एप्रिल मतदान


Election Commission | पाच राज्यांच्या निवडणुकीत अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण


पश्चिम बंगालमध्ये भाजपचं 200 जागांचे लक्ष्य

पश्चिम बंगालमध्ये आधीपासून निवडणुकीचे वारे वाहत आहे. आज निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर सर्वच पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक प्रचारात उतरतील. सध्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी सरकार आहे. मात्र, यावेळी भाजपने 200 हून अधिक जागा आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी मोठ मोठे मेळावे घेण्यात येत आहेत. याखेरीज डाव्या आणि काँग्रेसच्या युतीमुळे बंगालचे राजकारण आणखी रंजक झाले आहे.