Aadhaar Card Rule Change :  आधार कार्ड (Aadhaar Card) फक्त ओळखपत्र राहिले नाही तर प्रमुख कागदपत्र झालेय. प्रत्येक ठिकाणी आधारकार्डचा वापर केला जातो. आर्थिक, शासकीय अथवा इतर कोणत्याही ठिकाणी आधारकार्डचा वापर केला जातो. अनेक सरकारी योजनांचा (Government Schemes) लाभ घेण्यासाठी आधारकार्डचा वापर केला जातो. आता आधारकार्डसंदर्भात मोठी अपडेड समोर आली आहे. आता आधारकार्ड तयार करण्यासाठी फिंगरप्रिंटची गरज लागणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) यांनी आज याबाबतची माहिती दिली. ट्विटवर पोस्ट करत UIDAI ने महत्वाची माहिती दिली. 
 
IRIS Scan द्वारे करा नावनोंदणी - 


आधारकार्ड तयार करण्याच्या नियमांत सरकारने बदल केला आहे. बोटाचे ठसे नसणाऱ्या व्यक्तींसाठी सरकारने पाऊल उचलले आहे. अशा व्यक्तींची आधार नोंदणी करण्यासाठी आयरिस स्कॅन (IRIS Scan) चा वापर करण्यात येणार आहे.  (Aadhaar Card Enrollment) जे शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत, म्हणजे ज्यांना हात किंवा बोटे नाहीत, त्यांना आधार कार्ड बनवणे आता सोपे झाले आहे. नव्या नियमांतर्गत बोटांचे ठसे नसताना डोळ्यांच्या स्कॅनद्वारेही आधार काढता येणार आहे.


आधार नियमांत का केला बदल ?


केरळमधील एका व्यक्तीला बोटे नसल्याच्या कारणास्तव आधार नोंदणी करता आली नाही.  त्यामुळे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच जलशक्ती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तिची नावनोंदणी करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे निर्देश दिले.


त्यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या टीमने  केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कुमारकम येथे जोसिमोल पी जोस यांच्या घरी भेट दिली आणि त्यांचा आधार क्रमांक तयार करून घेतला.  आता आधारच्या मदतीने जोसिमोल पी जोस आता सामाजिक सुरक्षा निवृत्तीवेतन तसेच कैवल्य या दिव्यांगांसाठीच्या पुनर्वसन योजनेसह विविध फायदे आणि सेवांचा लाभ घेऊ शकेल. 






अपवादात्मक नावनोंदणी अंतर्गत आधार प्राधिकरण - युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) दररोज सुमारे एक हजार व्यक्तींची आधार नोंदणी करते. आजपर्यंत, आधार प्राधिकरणाने बोटे नसलेल्या किंवा अन्य कारणांमुळे बोटे किंवा बुबुळ किंवा दोन्ही बायोमेट्रिक्स प्रदान करण्यात अक्षम असलेल्या सुमारे 29 लाख व्यक्तींना आधार क्रमांक जारी केले आहेत. जोसिमोलिन यांना आधी नावनोंदणी केल्यावर आधार क्रमांक का जारी केला गेला नाही, याची कारणे आधार प्राधिकरणाने तपासली तेव्हा, आधार नोंदणी ऑपरेटरने अपवादात्मक नावनोंदणी प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे असे घडल्याचे लक्षात आले.