मुंबई : इंडिया आघाडीची ( I.N.D.I.A. Alliance Meeting) चौथी बैठक मंगळवार 19 डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी केली. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर इंडिया आघाडीची ही पहिलीच बैठक असेल. ट्विट करत जयराम रमेश यांनी याबाबत माहिती दिली. इंडिया आघाडीची ही चौथी बैठक दिल्ली (Delhi) येथे होणार आहे.
सध्या इंडिया आघाडीमध्ये बरेच वाद सुरु असल्याचं चित्र आहे. त्यामुळे विरोधकांच्या या युतीमध्ये सध्या बराच तणाव आल्याच पाहायला मिळत आहे. त्याचवेळी काँग्रेसेचे नेते जयराम रमेश यांनी ही पोस्ट केली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, भारत आघाडीत सामील असलेल्या पक्षांच्या नेत्यांची चौथी बैठक मंगळवार, 19 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे दुपारी 3 वाजल्यापासून होणार आहे.
जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता
या बैठकीत जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संयुक्त निवडणूक प्रचाराबाबतही बैठकीत चर्चा होऊ शकते. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत विरोधी गटाच्या ऐक्याचा विषय 'नॉट आय, वी' असेल.
6 डिसेंबर रोजी होणार होती बैठक
यापूर्वी ही बैठक 6 डिसेंबरला होणार होती. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूर्वनिर्धारित तारखेला बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली होती. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की ते राज्यात चक्रीवादळ मिचॉन्गचे व्यवस्थापन करत आहेत. त्याचवेळी ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबात लग्न होते, तर नितीश कुमार यांनी प्रकृतीचे कारण देत बैठकीला येण्यास नकार दिला होता.
सप्टेंबर महिन्यात झाली होती शेवटची बैठक
27 पक्षांच्या आघाडीची शेवटची बैठक सप्टेंबरमध्ये मुंबईत झाली होती, ज्यामध्ये समन्वय समित्यांची स्थापना करण्यात आली होती. या बैठकीचे आयोजन उद्धव ठाकरे यांनी केले होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आघाडीत सामील असलेल्या पक्षांमधील जागावाटपाची चर्चा रखडली होती, राज्यांमध्ये चांगले निकाल अपेक्षित होते ज्यामुळे त्यांच्या चर्चेला आणखी जोर येणार होता.