Incredible India: फॅशनच्या या जमान्यात प्रत्येकजण आपण कसे कपडे घालतो आणि कसे वावरतो याची काळजी घेतो. प्रत्येकाला उत्तम कपडे घालायचे असतात, त्यावर सुट होणारे शूज आणि चप्पलही घालायचे असतात. प्रत्येक लूकवर सुट होईल असे शूज आणि चप्पल असणं आता आवश्यक झालं आहे. चपलेशिवाय एक पाऊलही बाहेर चालणं आपल्यासाठी कठीण आहे.


जर तुम्हाला विचारलं गेलं की, तुम्ही चपलेशिवाय कायमचं जगू शकता का? तर बहुतेक लोकांचं उत्तर असेल- 'नाही', कारण अनवाणी चालणं सुरक्षित नाही. पायात काटा किंवा काच लागण्याची भीती असते. त्याच प्रमाणे, अनवाणी चालल्याने हानिकारक सूक्ष्म जीवाणू शरीरात प्रवेश करू शकतात. पण आपल्या भारत देशात एक असंही गाव आहे जिथे लोक नेहमी अनवाणी पायी चालतात.


गावाबाहेर काढावी लागते शूज, चप्पल


या गावात खासदार, जिल्हा दंडाधिकारी किंवा अन्य कोणताही सरकारी अधिकारी आला तरी त्यालाही गावाबाहेर चपला काढाव्या लागतात. एवढंच नाही, तर येथील लोक दवाखान्यातही जात नाहीत. कितीही अंतर कापावं लागलं तरी या गावातील लोक अनवाणी पायीच जातात. भारतात अनेक गावं असली, तरी हे गाव त्या सर्वांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे.


बाहेरून येणाऱ्या लोकांना आधी करावी लागते अंघोळ


आंध्र प्रदेशात असलेल्या या अनोख्या गावाचे नाव 'वेमना इंदलू' आहे. तिरुपतीपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात 25 कुटुंबातील सुमारे 80 लोक राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गावात सुरुवातीपासून ही परंपरा सुरू आहे. बाहेरून कोणी आले तर आंघोळ केल्याशिवाय गावात प्रवेश करता येत नाही असा गावाचा नियम आहे.


अहवालानुसार, गावातील बहुतांश लोक निरक्षर असून ते शेतीवर अवलंबून आहेत. या गावातील लोक कोणत्याही अधिकार्‍यापेक्षा त्यांचे दैवत आणि त्यांच्या गावचे सरपंच यांना जास्त मानतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते पालवेकरी समाजाचे आहेत. जे स्वत:ला मागासवर्गीय डोरावरलू म्हणून ओळखतात.


या गावचे लोक कधीही दवाखान्यात जात नाहीत


सर्वात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे येथे कोणीही दवाखान्यात जात नाही. हे लोक मानतात की, ते ज्या देवाची पूजा करतात ते त्यांचे रक्षण करतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गावातच बनवलेल्या मंदिरात सर्व लोक पूजा करतात. आजारी पडल्यावर लोक गावातच असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात, पण दवाखान्यात जात नाहीत.


हेही वाचा:


Morgan Stanley Report: मागील 10 वर्षात भारताचा चेहरामोहरा बदलला; मॉर्गेन स्टॅनलीच्या अहवालात केंद्र सरकारचे कौतुक


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI