मुंबई: महिला कुस्तीपटूंनी केलेल्या शोषणाच्या आरोपाचं प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत असल्याचं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीनुसार या प्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली असून तपास सुरु असल्याचंही ते म्हणाले. साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि संगीता फोगाट यांच्यासह अनेक पदकविजेते खेळाडूंनी राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष खासदार बृजभषण सिंह यांना अटक करावी अशी मागणी करत दिल्लीत आंदोलन करत आहेत.
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांना कुस्तीपटूंच्या आंदोलनावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, केंद्र सरकार प्रदर्शन करणाऱ्या पैलवानांच्या मुद्द्यावर संवेदनशील आहे. खेळाडूंनी मागणी केल्यानुसार दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या मागणीनुसार, भारतीय कुस्ती महासंघाने एक समिती नियुक्त केली आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
कुस्तीपटूंनी असं कोणतंही पाऊल उचलू नये जे खेळ किंवा खेळाडंना नुकसान पोहोचवेल असं आवाहन या आधी अनुराग ठाकुर यांनी केलं होतं.
त्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून या प्रकरणी कुस्तीपटू महिलांना न्याय द्यावा अशी मागणी केली होती. राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना 28 मे रोजी ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा आणि भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती.
राष्ट्रीय कुस्तीसंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन खेळाडूसह इतर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी देशातील प्रमुख कुस्तीपटूंनी दिल्लीत आंदोलन सुरू केलं आहे. बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करावी अन्यथा जिंकलेली पदकं ही गंगेत विलिन करण्याची धमकीही त्यांनी दिली होती.
... तर कुस्तीगीर महासंघ बरखास्त करू, जागतिक कुस्ती महासंघाचा इशारा
जागतिक कुस्ती महासंघानं या आंदोलनाची दखल घेतली आहे. कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेऊन हीन वागणूक देणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक पद्धतीनं चौकशी केली जावी. त्याचबरोबर 45 दिवसांत कुस्तीगीर महासंघाची नव्यानं निवडणूक घ्यावी, नाहीतर भारतीय कुस्तीगीर महासंघ बरखास्त केली जाईल, असा इशारा जागतिक कुस्ती महासंघानं दिला आहे
ही बातमी वाचा: