Covid-19 vaccine certificate : रेल्वेपासून विमान प्रवासापर्यंत अन् मॉलपासून रुग्णालयापर्यंत आज प्रत्येक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीचं प्रमाणपत्र दाखवणं सक्तीचं करण्यात आलं आहे. प्रत्येकवेळा मोबाईलमध्ये लसीकरण प्रमाणपत्र ठेवणं अथवा पर्समध्ये लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवणं कटकटीचं काम वाटणाऱ्यांनी यावर भन्नाट असा उपाय शोधलाय. मध्य प्रदेशमधील इंदौर येथील काही लोकांनी चक्क मोबाईल कव्हरचं लसीकरण प्रमाणपत्राचा तयार केलाय. याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत टी-शर्टवर लसीकरण प्रमाणपत्र छापण्यात आलं होतं. त्यानंतर आता इंदौरमधील हा प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  


इंदौरमधील लोकांनी आपल्या मोबाईल कव्हरवर लसीकरण प्रमाणपत्र छापलं आहे. यामुळे मोबाईल अधिक आकर्षक दिसतोय. शिवाय, लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगण्याची समस्याही दूर झाली आहे. अशा प्रकराचे कव्हर तयार करणाऱ्यांनी सांगितलं की, मोबाईल कव्हरवर लसीकरण प्रमाणपत्र छापण्याची मागणी दिवसागणिक वाढतच आहे. दररोज 30 पेक्षा जास्त जणांच्या ऑर्डर येत आहेत. मोबाईलवर लसीकरण प्रमाणपत्र छापण्याची सर्वात आधी सुरुवात केल्याचा दावा इंदौरमधील काछी परिसरातील कृष्णकांत शर्मा यांनी केलाय.  


कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आज सर्वच ठिकाणी सक्तीचं आणि महत्वाचं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन आपण दोन डोस घेतल्याचा दाखला हे प्रमाणपत्र आहे. लसीकरण प्रमाणपत्राद्वारे आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा देशात अन् विदेशात प्रवास करता येतं. आज प्रत्येक ठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र सक्तीचं करण्यात आलं आहे. कित्येकवेळा मोबाईलमध्ये चार्जिंग नसते अथवा इंटरनेट नसते, अशावेळी लसीकरण प्रमाणपत्र उपलब्ध होत नाही. प्रत्येकवेळा लसीकरण प्रमाणपत्र दाखवावं लागतेच. या कटकटीपासून सुटका व्हावी, यासाठी आयडियाची कल्पना लढवली गेली.  


मोबाईल कव्हरवर लसीकरण प्रमाणपत्र छापण्याच्या पद्धत अनेकांना आवडली. याची मागणी दिवसागणीक वाढतच चालली आहे.  कृष्णकांत शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कव्हरमध्ये हार्ड प्लॅस्टिक, सॉफ्ट सिलिकॉन, स्मोक कवर, ग्लास कवर आहेत. या कव्हरवर लसीकरण प्रमाणपत्र छापलं जातं. हे प्रमाणत्र UV प्रिंटिंग मशीनद्वारे छापले जातात. याची किंमत 150 रुपयांपासून 350 रुपयांपर्यंत आहे.  


संबधित बातम्या : 
लसीचं प्रमाणपत्र टी शर्टवर छापलं! लोकलनं प्रवास करायचाय तर 'हा' टी शर्ट घाला- फोटो होतोय व्हायरल
ना झंझट, ना कटकट, मोबाईलवर कोरोना लसीचं सर्टिफिकेट, 5 सोप्या टिप्स 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live