Pegasus Row: भारतासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या पेगासस हेरगिरी (Pegasus Spyware) प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडली. सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या तांत्रिक समितीच्या अहवालानुसार 29 पैकी 5 मोबाइलमध्ये मालवेअर आढळले असून पेगासस हेरगिरीचे ठोस पुरावे आढळले नसल्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टाच्या समितीला केंद्र सरकारने सहकार्य केले नसल्याची महत्त्वाची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली. पेगासस स्पायवेअर प्रकरणाची सुनावणी चार आठवड्यासाठी तहकूब करण्यात आली आहे.
इस्रायली कंपनीने विकसित केलेल्या पेगासस या स्पायवेअरने राजकीय नेते, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने पेगासस हेरगिरी प्रकरणी तांत्रिक समिती स्थापन केली होती.
सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. खंडपीठासमोर तीन भागातील अहवाल आले आहेत. त्यातील दोन अहवाल हे तांत्रिक समितीचा असून एक भाग हा सुप्रीम कोर्टातील निवृत्त न्यायाधीश आर. व्ही. रविंद्रन यांच्या समितीचा आहे.
या अहवालातील एक भाग सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे खंडपीठाने म्हटले. न्या. रविंद्रन यांच्या समितीने केलेल्या शिफारसी या सुप्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर प्रकाशित होणार असल्याचे सरन्यायाधीश रमण्णा यांनी सांगितले.
काही याचिकाकर्त्यांनी अहवालाच्या पहिल्या दोन भागाच्या प्रतीची मागणी केली. त्यावर याबाबत विचार करण्यात येईल असे कोर्टाने म्हटले. संपूर्ण अहवालाचा अभ्यास केल्याशिवाय कोणतीही टिप्पणी करता येणार नसल्याचे सरन्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठाने म्हटले.
पेगासस कसं काम करतं?
पेगासस स्पायवेअर हा असा प्रोग्रॅम आहे की ज्याने एखाद्या स्मार्टफोनमध्ये प्रवेश केला तर त्या स्मार्टफोनचा मायक्रो फोन, कॅमेरा, ऑडिओ, टेक्ट्स मेसेज, ई-मेल आणि लोकेशन अशी कोणतीही माहिती मिळवू शकतो. महत्वाचं म्हणजे व्हॉट्सअॅपचे एन्क्रिप्टेड ऑडिओ आणि मेसेजही या स्पायवेअरच्या माध्यमातून हॅक करता येतात आणि त्याचे डिकोड करता येते. एन्क्रिप्टेड मेसेज असे मेसेज असतात की ज्याची माहिती फक्त पाठवणाऱ्या आणि वाचणाऱ्या व्यक्तीला असते. ज्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मचा वापर करुन हे मेसेज शेअर करण्यात येतात त्या कंपनीलाही ते मेसेज वाचता येत नाहीत.
पेगासस स्पायवेअर आपल्या फोनमध्ये कसा येतो?
हा स्पायवेअर एखाद्याच्या फोनमध्ये टाकायचा असेल तर त्याला फक्त व्हॉट्सअॅप करावा लागतो. समोरच्या व्यक्तीने तो कॉल उचलला नाही तरीही तरी हा स्पायवेअर त्याच्या फोनमध्ये प्रवेश करतो. हा स्पायवेअर अॅण्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्रकारांना प्रभावित करु शकतो.
प्रकरण काय?
इस्रायलमधील एनएसओ ग्रुपने पेगासस हे स्पायवेअर विकसित केले आहे. मागील वर्षी पेगासस स्पायवेअरद्वारे जगभरातील राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांचा फोन हॅक करून त्यांची हेरगिरी करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला होता. जगभरातील काही प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांनी एकत्रित येऊन शोधपत्रकारितेत हा दावा केला होता. त्यानंतर फ्रान्स सरकारने नेमलेल्या समितीच्या चौकशीत त्यांच्या दोन पत्रकारांचे फोन हॅक झाल्याच्या दाव्याला दुजोरा देण्यात आला होता. त्याशिवाय, इस्रायल सरकारनेदेखील एनएसओ ग्रुपची चौकशी सुरू केली होती. पेगासस हे स्पायवेअर तंत्रज्ञानाची विक्री खासगी व्यक्ती, संस्थांना नव्हे तर सरकारलाच देण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण एनएसओ ग्रुपने दिले होते.
भारतातही अनेकांची पेगाससद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर, दोन केंद्रीय मंत्री, माजी निवडणूक आयुक्त, सुप्रीम कोर्टाचे दोन रजिस्ट्रार, निवृत्त न्यायाधीश, माजी अॅटर्नी जनरल यांचे निकटवर्तीय, काही सामाजिक कार्यकर्ते आणि 40 पत्रकारांवर पेगाससद्वारे पाळत ठेवली गेली असल्याचे एका वृत्तात म्हटले होते.