नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आता कापड उत्पादन उद्योगामध्येही उतरली आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर बाबा रामदेव यांनी 'पतंजली परिधान' या नावाने आपल्या पहिल्या शोरुमचं उद्धाटन केलं आहे.

दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेसमध्ये आयोजित उद्धाटन कार्यक्रमात कुस्तीपटू सुशील कुमार, दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. येत्या डिसेंबर महिन्यात देशात जवळपास 25 नवीन 'पतंजली परिधान' हे स्टोअर सुरु करण्यात येणार आहेत. 'पतंजली परिधान'मध्ये भारतीय वेशभूषेसह पश्चिम पोशाख आणि इतर एक्सेसरीज मिळणार आहेत.

दिल्लीत सुरु करण्यात आलेल्या 'पतंजली परिधान'मध्ये जीन्स 1100 रुपयांना मिळत आहे. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर 15 टक्कयांची सवलतही पतंजलीकडून देण्यात आल्याची घोषणा बाबा रामदेव यांनी केली आहे.