नई दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. कोरोनावर औषध मिळाल्याचा दावा आतापर्यंत अनेक देशांनी केला आहे. यातच योगगुरु बाबा रामदेव यांनी देखील कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात केला होता. आज अखेर बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवरील आयुर्वेदिक औषध लॉन्च केले. एका पत्रकार परिषदेत योगगुरु रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत घोषणा केली. यावेळी औषधाच्या ट्रायलमध्ये सहभागी शास्त्रज्ञ, डॉक्टर, रिसर्चर उपस्थित होते. कोरोना व्हायरसवर मात करणाऱ्या आयुर्वेदिक औषधाचं नाव कोरोनिल असं आहे.


यावेळी रामदेव बाबा म्हणाले की,  संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस  असलेलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS), जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे.

आचार्य बालकृष्ण यावेळी म्हणाले की, आज पतंजली परिवारासाठी मोठा दिवस आहे. मानवतेच्या सेवेसाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. ही आनंदाची बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. पतंजलीच्या सर्व शास्त्रज्ञांचे,  NIMS यूनिवर्सिटीचे डॉक्टर बलवीर सिंह आणि सर्वांचं अभिनंदन. आयुर्वेद पुन्हा आपलं गतवैभव मिळवू शकेल, असा विश्वास आहे, यासाठी हे प्रेरक आहे.



कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात भारत चौथ्या स्थानी आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत 14 हजार 933 ने वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 40 हजार 215 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 48 हजार 190 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 56.37 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 78 हजार 014 रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात 10 हजार 994 रुग्ण बरे झाले झाले आहेत तर 312 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. देशात एकूण मृतांची संख्या 14 हजार 11 वर पोहोचली आहे.

माझा कट्टा कार्यक्रमात केला होता दावा

कोरोनावर औषध सापडलं असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी 13 जून रोजी केला होता. या औषधानं रुग्ण बरं होण्याचं प्रमाण जवळपास 99.99 टक्के आहे, असा दावा योगगुरु रामदेवबाबांनी केला होता.  बाबांच्या दाव्यानुसार त्यांच्याकडे आयुर्वेदिक औषधांच्या संशोधनासाठी 500 वैज्ञानिकांची मोठी टीम कार्यरत आहे. केवळ कोरोनाच नव्हे तर वेगवेगळ्या रोगांवर औषध शोधण्याचं प्रमाण सातत्यानं पतंजली करतेय, असं रामदेव बाबा त्यावेळी म्हणाले होते.

Ramdev Baba | कोरोनावर सापडलेला रामबाण उपाय नेमका काय आहे? ऐका योगगुरू रामदेव बाबांकडून | माझा कट्टा