पाटणा : बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरात आगीची (Fire) भीषण घटना घडली असून या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेतील जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक (Police) चंद्र प्रकाश यांनी माध्यमांशी बोलताना दिली. पाटणा (Patana) स्टेशनपासून जवळच असलेल्या पाल हॉटेलसह तेथील रेस्टॉरंटमध्ये ही आग लागल्याची घटना घडली. आगीच्या घटनेनंतर रेस्टॉरंटमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. 


पाल हॉटेलमधील आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मोठ्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली, पण तोपर्यंत 2 जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर, 20 जण आगीत होरपळले होते. आगीतील जखमींना रुग्णालयात दाखल केले असता, तिथे चार जणांनी दम सोडला. 


आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आजुबाजूच्या परिसरातील लाईट कट करण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. जवळपास 45 जणांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात जवानांना यश आले, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या प्रमुख शोभा अहोतकर यांनी दिली. आगीत होरपळलेल्या 38 जणांना पाटणा येथील पीएमसीएच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, पाटणा रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच ही दुर्घटना घडल्यामुळे एकच धांदल उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अनेकांचे जीव वाचवले, हॉटेलच्या इमारतीत अडकलेल्यांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले.






पाटण्यातील या आगीच्या घटनेचा भयानक व्हिडिओ समोर आला असून आगीत हॉटेल जळून खाक झाले आहे. त्यामध्ये, सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याचेही दिसून येत आहे. पोलीस अधीक्षकांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच, आगीतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास आदेश दिले होते.